जोधपूर
Asaram's life sentence continued राजस्थान उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला मोठा दिलासा देण्यास नकार दिला असून त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. जोधपूर खंडपीठाने दिलेल्या या निर्णयामुळे देशभर गाजत असलेले हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सामूहिक बलात्काराचा आरोप सिद्ध होत नाही. त्यामुळे या विशिष्ट आरोपातून आसारामला दिलासा देण्यात आला आहे. मात्र, अल्पवयीन पीडितेवरील बलात्काराशी संबंधित इतर गंभीर आरोप आणि त्यावर आधारित दोषसिद्धी व जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

न्यायमूर्ती अरुण मोंगा आणि न्यायमूर्ती योगेंद्र कुमार पुरोहित यांच्या खंडपीठाने आसारामसह या प्रकरणातील इतर सहआरोपींच्या अपिलांवरही निकाल दिला. त्यानुसार सहआरोपी शिल्पी आणि शरच्चंद्र यांना काही अंशी दिलासा देण्यात आला असला तरी त्यांच्या शिक्षेतील महत्त्वाचे भाग कायम ठेवण्यात आले आहेत. हे प्रकरण २०१३ मध्ये जोधपूर येथे दाखल झाले होते. आश्रमातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर ठेवण्यात आला होता. तपासानंतर दाखल झालेल्या आरोपपत्रानंतर विशेष न्यायालयाने २०१८ मध्ये त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सध्या तो पॅरोलवर बाहेर असून, न्यायालयाच्या नव्या निर्णयानंतर त्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.