कच्छ,
ats operation in kutch गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि भारतीय तटरक्षक दलाने संयुक्त कारवाई करत कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळ मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अरबी समुद्र मार्गे भारतात आणले जात असलेले तब्बल ११५ किलो कोकेन हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणात एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ५०० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गुप्त माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने भारतीय तटरक्षक दलासोबत विशेष शोधमोहीम राबवली. मुंद्रा बंदर परिसरात समुद्रात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाच्या इंटरसेप्टर बोटी तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. तपासादरम्यान मुंद्रापासून काही सागरी मैल अंतरावर उभ्या असलेल्या एका कंटेनर जहाजावर संशय निर्माण झाला. जहाजातून काही पिशव्या समुद्रात फेकण्यात येत असल्याचे सुरक्षा पथकाच्या निदर्शनास आले.
यानंतर संयुक्त पथकाने रात्रीच्या अंधारात आणि कमी दृश्यमानतेत मोठे ऑपरेशन राबवत समुद्रातून पाच पिशव्या ताब्यात घेतल्या. या पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पावडरने भरलेली ११५ पाकिटे आढळली. प्रत्येक पाकिटाचे वजन सुमारे एक किलो असल्याचे समोर आले असून, प्राथमिक तपासात हा पदार्थ कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईनंतर संबंधित कंटेनर जहाज बंदरावर आणण्यात आले असून, त्याची सखोल तपासणी सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकाची चौकशी केली जात असून, या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित इतर संशयितांचाही शोध घेतला जात आहे.ats operation in kutch भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएस आणि इतर केंद्रीय यंत्रणा संयुक्तपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी या रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू असल्याचे सांगितले.