बीड
Shivaji Shinde बीड जिल्ह्यातील परळी शहरात शिंदेसेना गटाचे स्थानिक नेते शिवाजी शिंदे यांच्यावर कोयत्याने झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परळीतील एका हॉटेलमध्ये ही थरारक घटना घडली असून, हल्लेखोर युवकाने अचानक हॉटेलमध्ये घुसून शिंदे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात शिवाजी शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत हल्लेखोर युवकाला पकडून ठेवले. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली. संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. हल्लेखोर नेमका कोण आहे, त्याचा उद्देश काय होता आणि या हल्ल्यामागे वैयक्तिक वाद की राजकीय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.या घटनेमुळे परळी शहरासह बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, यवतमाळ Shivaji Shinde जिल्ह्यातही शिंदेसेना गटाच्या नगरसेवकावर हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आर्णी नगरपालिकेतील शिंदेसेनेचे नगरसेवक पवन चाफले यांच्यावर दोन जणांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. आर्णी नगरपालिकेच्या उपाध्यक्षांच्या केबिनमध्ये घुसून ही मारहाण करण्यात आली. किरकोळ कारणावरून झालेल्या या हल्ल्यात पवन चाफले जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आर्णी शहरातही राजकीय वातावरण तापले आहे.त्याचवेळी धाराशिव जिल्ह्यात महामार्गांवर चालत्या वाहनांमधून चोरी करणाऱ्या टोळ्यांचा धुमाकूळ वाढल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी धुळे-सोलापूर महामार्गावरून चालत्या वाहनातून शेळ्या चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता लातूर-पुणे महामार्गावर तेलाच्या बॉक्सची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. लातूरहून साताऱ्याकडे तेल वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून येडशी परिसरात तब्बल ५० बॉक्स चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे.वाहन चालक आणि मालकांनी खराब रस्ते आणि वाहनांची कमी झालेली गती याचा फायदा घेत चोरट्यांकडून अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या जात असल्याचा आरोप केला आहे. महामार्गांवरील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे वाहतूकदारांमध्ये संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरीचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे.मराठवाडा आणि विदर्भातील या सलग घटनांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.