बायजूच्या संस्थापकाला सहा महिन्यांचा तुरुंगवास

    दिनांक :27-May-2026
Total Views |
सिंगापुर शहर,
Byju's Founder Sentenced to Prison भारतीय एडटेक क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक आणि बायजूजचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाच्या अवमान प्रकरणात त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून, ७०,५०० डॉलर्सचा दंड भरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.न्यायालयाच्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ पासून सुरू असलेल्या मालमत्तेशी संबंधित अनेक आदेशांचे रवींद्रन यांनी वारंवार उल्लंघन केले होते. त्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेत ही शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यांना अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
 

byju 
याशिवाय, सिंगापूर न्यायालयाने त्यांना ‘बेअर इन्व्हेस्टको प्रायव्हेट लिमिटेड’ या संबंधित कंपनीतील शेअर्सच्या मालकीबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील खटला कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या उपकंपनीकडून दाखल करण्यात आला असून, निधी व्यवस्थापन आणि गुंतवणुकीशी संबंधित वादातून हा खटला सुरू आहे. बायजू रवींद्रन हे ‘थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे संस्थापक असून, या कंपनीने शिक्षण क्षेत्रात मोठा विस्तार करत त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली होती. मात्र मागील काही वर्षांपासून कंपनी आर्थिक अडचणी आणि गुंतवणूकदारांशी संबंधित कायदेशीर वादांमुळे चर्चेत आहे. आता सिंगापूर न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना आणखी मोठा कायदेशीर झटका बसला आहे.