मुंबई
Chunari Chunari remix, आगामी है जवानी तो इश्क होना है या चित्रपटातील लोकप्रिय ‘चुनरी चुनरी’ या गाण्याच्या रिमेकवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मूळ गाण्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांनीही या रिमिक्सवर तीव्र टीका केली आहे.
या चित्रपटातील रिमेक गाण्यात अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे दिसत आहेत. मात्र गाणे प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी मूळ गाण्याच्या तुलनेत रिमिक्सची गुणवत्ता कमी झाल्याची टीका केली आहे.
या वादावर भाष्य करताना अभिजीत भट्टाचार्य यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “डेव्हिड धवनचा मुलगा सलमान खान होऊ शकत नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि वरुण धवन यांच्यावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनोरंजनसृष्टीत नवा वाद निर्माण झाला आहे.अभिजीत यांनी पुढे सांगितले की, ‘चुनरी चुनरी’ हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत लोकप्रिय गाण्यांपैकी एक असून ते आजही ट्रेंडिंगमध्ये आहे. “सलमान खानच्या करिअरमधील हे सर्वात मोठे गाणे होते . त्यावेळी तो नवोदित कलाकार होता, सुपरस्टार नव्हता,” असे ते म्हणाले. तसेच वरुण धवन आणि सलमान खान Chunari Chunari remix यांची तुलना योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रिमिक्स आवृत्तीबाबत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत म्हटले की, “जेव्हा मी हे गाणे ऐकले तेव्हा मला ते भजन वाटले . मूळ गाण्याचे भावविश्व आणि अभिनय आता रिमिक्समध्ये हरवले आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, जर या रिमिक्ससाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, तरीही त्यांनी दोनदा विचार केला असता.दरम्यान, ‘है जवानी तो इश्क होना है’ हा चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असून यात वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या ५ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या या गाण्याच्या रिमिक्सवरून सुरू झालेला वाद आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया यामुळे चित्रपटाची चर्चा अधिकच वाढली आहे.