मुंबई
Ranveer Singh अभिनेता रणवीर सिंह याने डॉन 3 या बहुचर्चित चित्रपटातून शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी अचानक माघार घेतल्याच्या प्रकरणाने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तर यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने रणवीरविरोधात असहकाराचा आदेश जारी केला असून या निर्णयावर आता अभिनेता मनोज वाजपेयी याने प्रतिक्रिया दिली आहे.
‘गव्हर्नर’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात मनोज वाजपेयी उपस्थित होते . यावेळी माध्यमांनी त्याला रणवीर सिंह आणि एक्सेल एंटरटेन्मेंट यांच्यात सुरू असलेल्या वादाविषयी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मनोज म्हणाले , “या वादाबद्दल माझ्याकडे फारशी स्पष्ट माहिती नाही. इंडस्ट्रीतील बहुतेक लोक ही बाब सोशल मीडियावरूनच वाचत आहेत. आम्हालाही यामागचे संपूर्ण सत्य माहीत नाही. मात्र इंडस्ट्रीचा भाग म्हणून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की हे प्रकरण लवकरात लवकर मिटावे .”
दरम्यान, रणवीरविरोधातील कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. निर्माता संजय गुप्ता यांनी सोशल मीडियावर FWICE च्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले की, “जेव्हा एखादा मोठा अभिनेता चित्रपटाचं शूटिंग करतो, तेव्हा सेटवर ३०० हून अधिक कामगार कार्यरत असतात. अशा अभिनेत्यावर बंदी घालून तुम्ही त्याला नाही, तर त्या कामगारांच्या उपजीविकेलाच फटका देत आहात. या निर्णयाचा अर्थ तरी काय?”
या संपूर्ण वादाची Ranveer Singh सुरुवात एप्रिल महिन्यात झाली होती. फरहान अख्तरने ‘डॉन 3’ चित्रपटातून रणवीरने अचानक बाहेर पडल्याची तक्रार FWICE कडे केली होती. या निर्णयामुळे निर्मिती संस्थेला सुमारे ४५ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचंही सांगण्यात आलं. तक्रार प्राप्त झाल्यानंतर फेडरेशनने रणवीरला त्याची बाजू मांडण्यासाठी तीन स्वतंत्र नोटिसा पाठवल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.या घडामोडींमुळे बॉलिवूडमध्ये करारबद्धता, कलाकारांची जबाबदारी आणि निर्मात्यांचं आर्थिक नुकसान या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. रणवीर सिंहकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.