सोलन,
Forest fire in Himachal उत्तर भारतात तीव्र उष्णतेचा कहर सुरू असताना हिमाचल प्रदेशात वणव्यांनी परिस्थिती अधिकच गंभीर केली आहे. सोलन जिल्ह्यातील कसौली परिसरात जंगलाला भीषण आग लागली असून ही आग वेगाने पसरत हवाई दलाच्या तळाजवळ पोहोचली आहे. त्यामुळे परिसरात मोठी धावपळ सुरू झाली आहे.आग नियंत्रणाबाहेर जात असल्याने भारतीय हवाई दलालाही तातडीने पाचारण करण्यात आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी हवाई दलाने एमआय-१७ आणि चिनूक ही दोन शक्तिशाली हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. ही हेलिकॉप्टर चंदीगडमधील सुखना तलावातून पाणी उचलून आगीवर मारा करत आहेत.

दरम्यान, वन विभाग आणि अग्निशमन दलाची पथकेही घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग वेगाने पसरत असून परिस्थिती नियंत्रणात आणणे आव्हानात्मक ठरत आहे.कसौलीतील जंगलातील आगीने मोठा परिसर व्यापला असून आगीच्या ज्वाळा हवाई दल तळाच्या अगदी जवळ पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. याच दरम्यान शिमलाजवळील राजहाना गाव परिसरातही वणवा लागल्याची घटना समोर आली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे देशातील अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून काही शहरांमध्ये तापमान ४७ अंशांच्या पुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे जंगलाग्नीसारख्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.