नागपूर,
Parade Again After 40 Years डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील ४० वर्षांपूर्वीचे माजी राष्ट्रीय छात्र सैनिक एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देणारा स्नेहमिलन सोहळा नुकताच करुणा फार्म, वर्धा मार्ग येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल चार दशकांनंतर सर्व छात्र सैनिकांची भेट झाल्याने वातावरण भावूक झाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मार्शल सुनील सारीपुत्त यांनी भूषविले. यावेळी माजी कॅप्टन डॉ. दर्शिका पाटील, डॉ. अरविंद गणवीर, मेजर डॉ. डी. बी. जाधव आणि आयु. दीपक पाटील यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

प्रास्ताविकातून इंद्रराज वासे यांनी स्नेहमिलन आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. Parade Again After 40 Years यानंतर उपस्थित माजी छात्र सैनिकांनी छात्र सेनेतून मिळालेल्या प्रेरणा, शिस्त आणि मार्गदर्शनामुळे आज विविध क्षेत्रांत कार्यरत राहून समाजासाठी योगदान देत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. शासकीय सेवेत पदोन्नती मिळालेल्या तसेच सेवानिवृत्त सदस्यांचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख अतिथी डॉ. अरविंद गणवीर यांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत या स्नेहमिलन उपक्रमाचे कौतुक केले. मेजर डॉ. डी. बी. जाधव यांनी छात्र सेनेत मिळालेली शिस्त आजही सर्व सदस्य जपत असल्याचे समाधान व्यक्त केले. तर कॅप्टन दर्शिका वानखेडे यांनी ४० वर्षांनंतर घडलेला हा स्नेहमिलन सोहळा ऐतिहासिक ठरेल, असे मत व्यक्त केले. Parade Again After 40 Years अध्यक्षीय भाषणात मार्शल सुनील सारीपुत्त यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग मांडत समाजाला आजही छात्र सैनिकांच्या संघटित कार्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान भविष्यातील उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व सदस्यांनी एकमताने ‘डॉ. आंबेडकर माजी राष्ट्रीय छात्र सेना निधी बँक’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा ‘परेड’ अनुभवण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून येत होते. Parade Again After 40 Years या कार्यक्रमाला सुमेध कांबळे, राजेश घुडे, इंद्रराज वासे, सुधाकर मून, प्रशांत नगराळे, देवदत्ता पाटील, निरंजन पाटील, संजय आठवले, गोवर्धन वानखेडे, विजय सरदार, शेषराव पाटील, आनंद गाणार, दिलीप पाटील, श्याम कुलमते, ईश्वर पोटपोसे, चंद्रकांत कापसे, कृष्णा पाटील, हर्षल हिरेखन, खुशाल लाडे, संतोष इंगळे, प्रशांत शंभरकर, भीमराव मैस्कर, वामन माटे, प्रशांत बेताल, अनिरुद्ध सुखदेवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विजय वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश घुडे यांनी मानले.
सौजन्य: विजय दाणी, संपर्क मित्र