अर्जुनी मोरगावच्या वडेगावात ‘प्लॅस्टिक द्या, गूळ न्या’

ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक उपक्रम: पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यासाठी ठरतोय दिशादर्शक

    दिनांक :27-May-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
Arjuni Morgaon वाढत्या प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि गावाला 100 टक्के स्वच्छ बनवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या वडेगाव रेल्वे स्टेशन ग्रामपंचायतीने एक अत्यंत अभिनव आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. सरपंच श्रीकांत भीमराव लोणारे यांच्या संकल्पनेतून गावात सध्या ‘प्लॅस्टिक द्या आणि मोबदल्यात गूळ न्या’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत असून, याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर हा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे चित्र आहे.
 
 
Arjuni Morgaon
 
गावातील रस्ते, नाले आणि मोकळ्या जागांवर साचणारा प्लॅस्टिक कचरा पर्यावरणासाठी आणि जनावरांसाठी अत्यंत घातक ठरत आहे. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी वडेगाव स्टेशनचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून ही संकल्पना मांडली. Arjuni Morgaon या उपक्रमांतर्गत, नागरिकांनी आपल्या घरातील आणि परिसरातील प्लॅस्टिकच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या, वेफर्सचे रॅपर्स आणि इतर टाकाऊ प्लॅस्टिक गोळा करून ग्रामपंचायतीमध्ये जमा करायचे आहे. ग्रामपंचायतीकडून जमा केलेल्या 1 किलो प्लॅस्टिकच्या बदल्यात नागरिकांना चक्क 1 किलो ‘गूळ’ मोफत दिला जात आहे. या उपक्रमामुळे एकीकडे गाव प्लॅस्टिकमुक्त होत असताना दुसरीकडे साखरेला एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय असलेला गूळ नागरिकांना मोफत मिळत आहे. विशेष म्हणजे, गुळाच्या आशेने आणि उत्साहाने गावातील लहान मुलेही रस्त्यावरील व परिसरातील प्लॅस्टिक गोळा करत आहेत. या निमित्ताने भावी पिढीत स्वच्छतेबाबत मोठी जनजागृती होत आहे. ग्रामपंचायतीकडे जमा झालेल्या या हजारो किलो प्लॅस्टिक कचर्‍याची अत्यंत सुरक्षित आणि योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढावा आणि गावकर्‍यांना आरोग्यासाठी फायदेशीर असा गोडवा मिळावा, या उदात्त उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. Arjuni Morgaon  यातून आमचे वडेगाव स्टेशन लवकरात लवकर 100 टक्के प्लॅस्टिकमुक्त आणि ‘शून्य-कचरा’ गाव बनेल, असा विश्वास आहे.
- श्रीकांत भीमराव लोणारे, सरपंच (ग्रामपंचायत वडेगाव स्टेशन)