गडचिरोली,
guidance on mpsc राज्यसेवेत करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणार्या विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व व मुख्य परीक्षांसाठी दर्जेदार आणि निशुल्क प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि गॅलेक्सी आयएएस अकॅडमी, पुणे यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमधील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
या कराराप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, गॅलेक्सी आयएएस अकॅडमीचे संचालक नयन राठोड, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. विवेक जोशी, स्पर्धा परीक्षा समितीचे समन्वयक डॉ. वैभव मसराम उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 5 जूनपर्यंत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेत 200 गुणांची लेखी प्रवेश परीक्षा आणि 25 गुणांची मुलाखत घेण्यात येणार असून, त्यातून 50 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठ परिसरात 18 महिन्यांच्या कालावधीसाठी पूर्णपणे निशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षांचा संपूर्ण अभ्यासक्रम, नियमित टेस्ट सिरीज, मुलाखत मार्गदर्शन, विषयानुसार अभ्यास साहित्य आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा समावेश असेल. गॅलेक्सी आयएएस अकॅडमी, पुणे येथील अनुभवी व नामांकित प्रशिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका, संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षा मासिके तसेच स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.guidance on mpsc प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम, पात्रता, नोंदणी प्रक्रिया आणि प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यसेवा क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.