इबोलाचा नागपुरात शिरकाव?

47 वर्षीय पुरुष गृहविलगीकरणात मनपाकडून आयसोलेशन वार्डची तयारी

    दिनांक :27-May-2026
Total Views |
नागपूर
Ebola Nagpur आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये थैमान घालणाèया इबोला विषाणूची दहशत आता भारतापर्यंत पोहोचली आहे. युगांडाहून भारतात आलेल्या एका महिलेत इबोलासदृश आजाराची गंभीर लक्षणे आढळल्याने बंगळुरूमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी युगांडाहून नागपुरात परतलेल्या 47 वर्षीय पुरुषाला मनपा आरोग्य विभागाने 21 दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. सध्या दोन्ही रुग्णांना इबोला झाल्याची पुष्टी झाली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणा पूर्ण सतर्क झाली आहे.
 
ebola
Ebola Nagpur  डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा आणि दक्षिणी सुदान या देशांमध्ये इबोलाने पुन्हा डोके वर काढले आहे. आतापर्यंत 200 हून अधिक मृत्यू झाले असून हजारांहून अधिक नागरिकांना लागण झाल्याचे वृत्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या उद्रेकाला ‘जागतिक सार्वजनिक आरोग्य आणिबाणी’ म्हणून घोषित केले आहे.
इबोला हा अत्यंत गंभीर व्हायरल हेमोरेजिक ताप आहे. संक्रमित व्यक्तीच्या रक्त, लाळ, घाम, उलटी यांसारख्या शरीरातील द्रव पदार्थांच्या थेट संपर्कातून हा विषाणू पसरतो. तीव्र ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब आणि अंतर्गत-बाह्य रक्तस्राव ही याची प्रमुख लक्षणे आहेत. मृत्युदर 50 ते 90 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. सध्या या आजारावर कोणतीही प्रभावी लस किंवा निश्चित औषध उपलब्ध नाही. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे.
Ebola Nagpur  ‘हाय अलर्ट;’ मनपाची तयारी
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. युगांडाहून आलेल्या 47 वर्षीय पुरुष प्रवाशाला मनपाच्या आरोग्य पथकाने ताब्यात घेऊन 21 दिवस होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. मनपा आरोग्य अधिकारी यांच्या माहितीनुसार, सध्या त्या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्याने इबोला रुग्णाच्या संपर्कात नसल्याचे सांगितले आहे. तरीही प्रोटोकॉलनुसार 21 दिवस दररोज त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. लक्षणे दिसल्यास तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले जाईल.
 
Ebola Nagpur नागपूर महानगरपालिकेने संभाव्य धोका लक्षात घेऊन इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे स्वतंत्र आयसोलेशन वार्ड उभारण्यास सुरुवात केली आहे. पीपीई किट, एन-95 मास्क, जीवनरक्षक औषधे व आवश्यक उपकरणांचा साठा करण्यात येत आहे. ‘बुन्डिबुग्यो’ स्ट्रेनसाठी अद्याप अधिकृत लस उपलब्ध नसल्याने केवळ सपोर्टिव्ह केअर व विलगीकरण हाच उपाय आहे.