आमगाव,
Incident on Gondia-Amgaon Route गोंदिया-आमगाव मार्गावरील ठाणा गावाजवळ एका ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना 27 मे रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. केशव उके (25), रा. बारबती, जि. सिवनी, (मप्र) असे मृताचे नाव आहे. त्याचा मृतदेह ट्रकच्या दोरीलाच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला असताना शरीरावर जखमा तसेच रक्ताचे डाग आढळल्याने हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत केशव उके हा ट्रक क्रमांक सीजी 04 एल आर 3392 मध्ये गुळ भरून नागपूर येथे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नागपूरकडे जाणारा ट्रक गोंदिया जिल्ह्यातील ठाणा गाव परिसरात कसा पोहोचला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून घटनास्थळी ट्रकच्या दोराने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह असला तरी मृताच्या पायावर आणि गळ्यावर जखमांचे निशाण दिसून आले. Incident on Gondia-Amgaon Route शरीरावर रक्त पडल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे या घटनेबाबत संशय अधिक गडद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आत्महत्या की घातपात, या दोन्ही शक्यतांवर आमगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे.