भारत इबोलाच्या अलर्ट मोडवर!

युगांडाहून आलेल्या महिलेत संशयित लक्षणे

    दिनांक :27-May-2026
Total Views |
बंगळुरू
India on Ebola Alert बंगळुरूत युगांडाहून आलेल्या एका महिलेमध्ये इबोला व्हायरसची संशयित लक्षणे आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या महिलेला सध्या सरकारी रुग्णालयात क्वारंटाइन करून देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, तिच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे पाठवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला काही दिवसांपूर्वी युगांडातून भारतात आली होती. तिला सौम्य अंगदुखीचा त्रास जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अद्याप भारतात इबोला संसर्गाचा एकही अधिकृत रुग्ण आढळलेला नाही.
 

इबोला  
 
विमानतळांवर प्रवाशांची तपासणी
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला इबोला प्रभावित क्षेत्रातून प्रवास करून आल्याने खबरदारी म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आफ्रिकन देशांमध्ये वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आरोग्य विभागाने प्रभावित देशांतून येणाऱ्या प्रवाशांना २१ दिवस स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून विमानतळांवर प्रवाशांची तपासणी वाढवण्यात आली आहे. सरकारने नागरिकांना घाबरून न जाता केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास देण्याचे आवाहन केले आहे.
बंगळुरूतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चेस्ट डिसीजेसला आयसोलेशन सेंटर म्हणून तर काही इतर रुग्णालयांना क्वारंटाइन आणि उपचार केंद्र म्हणून सज्ज ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाने जलद प्रतिसाद पथक (RRT) देखरेखीचे काम करत असल्याचेही स्पष्ट केले आहे.दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिकेतील काँगो आणि युगांडामध्ये वाढणाऱ्या इबोला प्रकरणांबाबत जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. काँगोमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि संशयित प्रकरणे नोंदली गेली असून परिस्थिती गंभीर होत असल्याचे सांगितले जात आहे.