धडक कारवाई! सुमारे ५५०० लिटर डिझेलसह नौका जप्त

    दिनांक :27-May-2026
Total Views |
पुणे / रत्नागिरी
Ratnagiri diesel smuggling जयगड खाडी परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या डिझेल तस्करी रॅकेटचा सीमाशुल्क विभागाने पर्दाफाश करत सोमवारी मध्यरात्री धडक कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ५ हजार ५०० लिटर तस्करीचे डिझेल, एक देशी मासेमारी नौका आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून या प्रकरणामागे मोठे सागरी तस्करी जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 
 

Jaigad creek,
 
 
पुणे सीमाशुल्क आयुक्तालयांतर्गत रत्नागिरी विभागाला जयगड खाडी परिसरात संशयित नौकेच्या माध्यमातून डिझेलची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनंतर कस्टम्सच्या पथकांनी किनारपट्टी आणि खाडीतील जलमार्गांवर कडेकोट पाळत ठेवत विशेष सापळा रचला. त्यानुसार २६ मे रोजी पहाटे सुमारे अडीच वाजता पडवे जेट्टी परिसरात संशयित नौका अडवण्यात आली.तपासणीदरम्यान संबंधित नौकेमध्ये मोठ्या ड्रमांमध्ये साठवलेले सुमारे ५५०० लिटर डिझेल आढळून आले. या नौकेवर पाच जणांचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता. प्राथमिक चौकशीत ही नौका प्रत्यक्ष मासेमारीसाठी वापरली जात नसून केवळ Ratnagiri diesel smuggling  तस्करीच्या उद्देशाने तिचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले
 
आहे.अधिकाऱ्यांच्या मते, हे डिझेल खोल समुद्रात कार्यरत असलेल्या मोठ्या बार्ज किंवा टगबोटमधून चोरून आणण्यात आले असावे. या संपूर्ण साखळीत सागरी मार्गाचा गैरवापर करून इंधनाची अवैध खरेदी-विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जप्त करण्यात आलेले डिझेल, नौका आणि संबंधित साहित्य सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.या कारवाईनंतर जयगड परिसरातील सागरी इंधन तस्करीचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कठोर उपाययोजनांची गरज असल्याची मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे. सीमाशुल्क विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून तस्करीमागील सूत्रधार आणि पुरवठा साखळीचा शोध घेतला जात आहे.