पुणे,
Lockdown in Pune? पुण्यात इंधन संकटामुळे अचानक लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामुळे शहरात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आणि पुणे पोलिसांनी या अफवेचे अधिकृत खंडन केले आहे. शहरात कोणताही लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट करत नागरिकांनी अशा खोट्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र त्याचा लॉकडाऊनशी कोणताही संबंध नाही.दरम्यान, पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून त्यानुसार मोर्चे, आंदोलने आणि मोठ्या सार्वजनिक सभांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामागे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे हा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाने हेही सांगितले आहे की, या आदेशांनुसार शस्त्रास्त्रे, दगड, स्फोटके किंवा धोकादायक वस्तू बाळगणे, तसेच भडकाऊ घोषणा किंवा भाषणे देणे यावर बंदी असेल. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि संबंधित वस्तू जप्त केल्या जातील. या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाने नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.