तेहरान,
strait of hormuz अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत आता मोठी राजनैतिक घडामोड सुरु झाली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दावा केला आहे की, दोन्ही देशांमध्ये प्राथमिक सामंजस्य कराराचा मसुदा तयार झाला असून, त्याअंतर्गत अमेरिका इराणवरील नौदल नाकेबंदी हटवण्यास तयार झाली आहे. त्याबदल्यात इराण होर्मुझ सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यास सहमती दर्शवणार असल्याचे सांगितले जात आहे.

इराणच्या सरकारी टीव्हीनुसार, या प्राथमिक आणि अनधिकृत मसुद्यात अमेरिकन सैन्याने इराणच्या आसपासच्या काही भागांतून माघार घेण्याचाही उल्लेख आहे. तसेच, युद्धानंतर विस्कळीत झालेली समुद्री वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू असल्याचे वृत्तात म्हटले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेलवाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. त्यामुळे ती खुली होण्याची शक्यता निर्माण होताच जागतिक ऊर्जा बाजारपेठांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या मसुद्यानुसार, इराण एका महिन्याच्या आत व्यापारी जहाजांच्या हालचाली युद्धपूर्व स्थितीत आणण्याचा प्रयत्न करेल. मात्र, युद्धनौकांच्या तैनातीबाबत कोणताही ठोस बदल करण्यात आलेला नाही. ओमानच्या सहकार्याने सामुद्रधुनीतील वाहतुकीचे नियंत्रण कसे ठेवले जाईल, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचेही सांगण्यात आले आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींची सखोल पडताळणी केली जाईल, असे इराणच्या माध्यमांनी स्पष्ट केले.
या संभाव्य कराराला ६० दिवसांच्या आत अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते. त्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून त्याला मान्यता मिळाल्यास, तो दोन्ही देशांसाठी बंधनकारक ठरू शकतो. फेब्रुवारी महिन्यात वाढलेल्या संघर्षानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात अप्रत्यक्ष चर्चांना सुरुवात झाली होती. या चर्चांमध्ये पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका बजावल्याचेही वृत्त आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आखाती प्रदेशातील अस्थिरतेमुळे जागतिक तेलबाजारावर मोठा परिणाम झाला होता. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि ऊर्जा पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे अनेक देश चिंतेत होते. भारतासारख्या इंधन आयात करणाऱ्या देशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू होणे हा मोठा दिलासा मानला जात आहे.
दरम्यान, विविध आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार अमेरिका आणि इराण यांच्यात व्यापक १४ कलमी करारावरही चर्चा सुरू आहे. या चर्चांमध्ये आर्थिक निर्बंधांमध्ये सवलत, इराणची जप्त मालमत्ता परत करणे आणि तेल निर्यातीवरील मर्यादा शिथिल करणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.strait of hormuz अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील इराणसोबतच्या चर्चांबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यांनी अलीकडेच सांगितले की, दोन्ही देशांमध्ये चांगल्या कराराच्या दिशेने वाटचाल सुरू असून, घाईघाईत निर्णय घेतला जाणार नाही. योग्य आणि टिकाऊ करार होण्यासाठी चर्चांना आवश्यक तो वेळ दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अंतिम करार होईपर्यंत इराणवरील नाकेबंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.