पुणे,
Minor's Confession in NEET Scam नीट-यूजीसी पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका क्लास संचालकाच्या अल्पवयीन मुलाने केंद्रीय अन्वेषण विभागासमोर महत्त्वाची कबुली दिल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याला परीक्षेच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा अंदाज सुमारे दहा दिवस आधीच मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.या खुलाशानंतर तपास अधिक तीव्र करण्यात आला असून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या १३ वर पोहोचली आहे. अल्पवयीन असल्यामुळे संबंधित साक्षीदाराला कायदेशीर सवलत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तपासात पुढे असेही समोर आले आहे की पुण्यातील एका शिक्षकावर आणि लातूरमधील काही व्यक्तींवर पेपर लीक नेटवर्कमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. सीबीआयने काही शिक्षक, कोचिंग सेंटर संचालक आणि मध्यस्थांवरही कारवाई केली आहे. प्रश्नपत्रिका मिळवणे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे या साखळीमध्ये अनेक जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून तपास यंत्रणा पुढील टप्प्यात आणखी मोठे खुलासे करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.