पुन्हा दणाणले मोबाईल; आजही इमर्जन्सी अलर्ट!

    दिनांक :27-May-2026
Total Views |
नागपूर,
mobile phone rang again कालप्रमाणेच आजही नागपूरसह विदर्भातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर एकाचवेळी आपत्कालीन अलर्ट संदेश आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अचानक मोठ्या आवाजात आलेल्या या अलर्टमुळे अनेक नागरिक दचकले, तर सोशल मीडियावरही या संदेशाची जोरदार चर्चा रंगली. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आणि गडचिरोलीसह विविध जिल्ह्यांतील मोबाईल वापरकर्त्यांना हा अलर्ट प्राप्त झाला. मात्र, हा कोणताही धोका नसून केंद्र सरकारच्या स्वदेशी मोबाईल आपत्ती इशारा प्रणालीच्या तांत्रिक चाचणीचा भाग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रणालीद्वारे आपत्ती किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांना तात्काळ सूचना देण्याची क्षमता तपासली जात आहे. त्यामुळे ठराविक भागांमध्ये एकाचवेळी अलर्ट संदेश पाठवून यंत्रणेची कार्यक्षमता पडताळली जात आहे. मात्र आज लोकांची तारांबळ उडाली नाही.
 
 
akert
दरम्यान, हवामान विभागाने विदर्भासाठी पुढील २४ तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. नागपूरसह अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांमध्ये रात्रीचे तापमानही जास्त राहणार असल्याने नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागू शकतो. प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा, पुरेसे पाणी पिण्याचा आणि अधिकृत सूचना व हवामान इशाऱ्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. मोबाईलवर आलेल्या या अलर्टमुळे नागरिकांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला असला, तरी हा केवळ प्रणाली चाचणीचा भाग असल्याने घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.