नवी दिल्ली,
Modi's Emotional Appeal to the People देशभरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून अनेक राज्यांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. उत्तर भारतापासून मध्य भारतापर्यंत नागरिक उकाड्याने हैराण झाले असून, कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्येही तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहून शरीरातील पाण्याची कमतरता होऊ देऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला.

पंतप्रधानांनी घराबाहेर पडताना पाणी सोबत ठेवण्याचे आणि गरजूंना पिण्याचे पाणी देण्याचे आवाहन केले. उन्हात त्रस्त असलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देणे हीच खरी मानवता असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक नागरिक घराबाहेर किंवा दुकानांसमोर पाण्याच्या घागरी ठेवून प्रवाशांची तहान भागवत आहेत, अशा उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.तीव्र उष्णतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा बेशुद्ध पडणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. अशा वेळी संबंधित व्यक्तीला त्वरित सावलीत नेऊन पाणी, ओआरएस किंवा इतर द्रवपदार्थ द्यावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
लहान मुले, वृद्ध नागरिक आणि उन्हात काम करणाऱ्या मजुरांना उष्णतेचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना आपल्या कुटुंबीयांची आणि आसपासच्या लोकांची काळजी घेण्याचे आवाहन केले. दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे आणि पुरेशी विश्रांती घ्यावी, असेही त्यांनी म्हटले.पंतप्रधान मोदी यांनी पक्षी आणि प्राण्यांची काळजी घेण्याचाही संदेश दिला. घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा दुकानाबाहेर पाण्याने भरलेले भांडे ठेवावे, जेणेकरून तहानलेल्या पक्ष्यांना दिलासा मिळेल, असे आवाहन त्यांनी केले.