मुंबई,
Nana Patekar मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत अजरामर ठरलेला ‘नटसम्राट’ हा केवळ एक चित्रपट किंवा नाटक नसून कलाकाराच्या भावविश्वाचा अत्यंत तीव्र प्रवास मानला जातो. या भूमिकेच्या भावनिक आणि मानसिक ताणाबद्दल अभिनेते नाना पाटेकर यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या मोठी चर्चा रंगली आहे. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नटसम्राटचे नाटक केले असते तर मी मेलो असतो.”
या वक्तव्यानंतर रंगभूमीप्रेमी आणि चाहत्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ‘नटसम्राट’सारखी भूमिका साकारताना कलाकाराला किती खोलवर जावे लागते याचा प्रत्यय नानांच्या वक्तव्यातून आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.‘नटसम्राट’ चित्रपटासाठी त्यांच्याकडे विचारणा झाली तेव्हाच त्यांनी स्पष्ट केले होते की ते नाटक करणार नाहीत; मात्र चित्रपटात काम करण्यास तयार आहेत. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले की, नाटक करताना कलाकाराला प्रत्येक प्रयोगात पूर्ण ताकदीने आणि भावनांनी भूमिका जगावी लागते. सलग दहा, पंधरा किंवा पंचवीस प्रयोगांनंतर स्वतःवर इतका मानसिक ताण येईल की आपण टिकणार नाही, अशी भीती त्यांना वाटत होती.
यावेळी नाना पाटेकर Nana Patekar यांनी ‘नटसम्राट’ साकारलेल्या ज्येष्ठ कलाकारांचाही विशेष उल्लेख केला. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट्ट, चंद्रकांत गोखले आणि यशवंत दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या भूमिकेला विलक्षण उंचीवर नेल्याचं त्यांनी सांगितलं. “ज्यांनी ज्यांनी नटसम्राट केले त्यांनी त्या भूमिकेत स्वतःला पूर्णपणे झोकून दिले . त्यांच्या अभिनयाचा संदर्भ आमच्यासमोर होता. त्यामुळे आपण पडद्यावर जे केले ते त्यांच्या तुलनेत खूप छोटे वाटते ,” अशा शब्दांत नानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.