दुशानबे,
ndia-Pakistan Water Dispute पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलत सिंधू पाणी करार निलंबित केला होता. या निर्णयामुळे पाकिस्तानवर मोठा परिणाम झाला असून अद्यापही त्याचे परिणाम जाणवत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारताकडे सिंधू पाणी कराराचा आदर करण्याची विनंती केली आहे. ताजिकिस्तानच्या दुशानबे येथे आयोजित उच्चस्तरीय जल परिषदेत पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण समन्वय मंत्री डॉ. मुसादिक मलिक यांनी भारताच्या भूमिकेवर टीका केली. त्यांनी आरोप केला की भारत सामायिक जलस्रोतांचे राजकारण करत आहे आणि एकतर्फी निर्णयांमुळे जागतिक जलसुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

मलिक यांनी पुढे म्हटले की, आंतरराष्ट्रीय नद्यांवरील अशा निर्णयांमुळे अन्न उत्पादन, जलसुरक्षा आणि हवामान बदलाशी संबंधित समस्या अधिक गंभीर होऊ शकतात. त्यांनी भारताला सिंधू पाणी कराराचे पालन करण्याचे आणि आंतरराष्ट्रीय मध्यस्थी यंत्रणांचा आदर करण्याचे आवाहन केले. दरम्यान, भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेमध्ये सिंधू पाणी करार निलंबित करण्याचा निर्णयही घेतला होता. पाकिस्तानने हा निर्णय फेटाळून लावत, करारानुसार पाणी रोखण्याचा प्रयत्न युद्धसदृश कृत्य मानले जाईल असा इशाराही दिला होता. १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला हा करार भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वाटपाचे नियमन करतो. सध्याच्या घडामोडींमुळे हा दीर्घकालीन करार पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.