आमचे पूर्वज हिंदूच; मंत्र्यांच्या कबुलीने पाक हादरला

    दिनांक :27-May-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Our Ancestors Were Indeed Hindus पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी देशातील शिक्षण व्यवस्था आणि इतिहास मांडणीबाबत केलेल्या विधानामुळे पाकिस्तानात नव्या वादाला तोंड फुटले आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी पाकिस्तानी मुलांना चुकीचा आणि अपूर्ण इतिहास शिकवला जात असल्याची कबुली दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानातील ओळख, संस्कृती आणि इतिहासाच्या राजकारणावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तानातील अनेक लोक आपल्या मूळ इतिहासापासून दूर गेले आहेत. अनेकजण आपले पूर्वज अरब किंवा इराणमधून आले असल्याचा दावा करतात, मात्र वास्तव वेगळे आहे. माझे पूर्वज हिंदू होते, त्यामुळे मी कमी पाकिस्तानी ठरत नाही, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. पाकिस्तानातील समाजात हिंदू पूर्वजांविषयी नकारात्मक भावना निर्माण करण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला.
 
 
khawaja asif
 
 
चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोकांना मिटविले
इतिहासाच्या पुस्तकांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींना जाणीवपूर्वक इतिहासातून दूर ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांना सत्य इतिहास शिकवला जात नसून विशिष्ट मानसिकता तयार करण्यासाठी शिक्षणाचा वापर केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेच्या युद्धांमध्ये पाकिस्तानचा वापर करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्यात आली आणि त्यानुसार इतिहास सादर करण्यात आला, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, पाकिस्तानची इस्रायलविषयीची भूमिका कायम असल्याचेही आसिफ यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही मुस्लिम देशांना अब्राहम करारात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर पाकिस्तानवरही दबाव वाढला होता. मात्र, पाकिस्तान आपल्या मूलभूत भूमिकेपासून हटणार नसल्याचे आसिफ यांनी सांगितले. स्वतंत्र पॅलेस्टिनी राष्ट्र स्थापन होईपर्यंत इस्रायलला मान्यता देणार नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
 
ख्वाजा आसिफ यांच्या विधानाची अमेरिकेतही चर्चा सुरू झाली आहे. रिपब्लिकन नेते लिंडसे ग्रॅहम यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, इस्रायलविषयीचा पाकिस्तानचा दृष्टिकोन दीर्घकाळ नकारात्मक राहिल्याचे म्हटले. तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये पाकिस्तानची मध्यस्थी विश्वासार्ह ठरेल का, यावरही त्यांनी शंका व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणामुळे पाकिस्तानात इतिहास, शिक्षण आणि राष्ट्रीय ओळखीबाबतचा वाद पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील काही दिवसांत या मुद्द्यावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.