पुणे,
Porsche case in Pune पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाल जामिनावर सुटताच त्यांच्या कुटुंबाने मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विशाल अगरवाल आणि त्यांची पत्नी नोटांच्या हारांनी सजून डान्स करताना दिसत असून, हा प्रकार मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कुटुंबीय “मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्तों सलाम करो” या गाण्यावर नाचताना दिसतात. या सेलिब्रेशनमुळे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल अगरवाल यांना काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. जामिनावर सुटका झाल्यानंतर कुटुंबीयांनी हा भव्य कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले जात आहे. मात्र या व्हिडिओची अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली होती. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप झाले होते. सुरुवातीला अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते, तर नंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना जामीन मिळाला. याच प्रकरणात विशाल अगरवाल यांनाही अटक झाली होती, मात्र नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. सध्या या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, या प्रकारावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.