म्हैसूर
Ranveer Singh अभिनेता रणवीर सिंह सध्या दोन वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत आला आहे. एकीकडे डॉन 3 या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे ‘कांतारा : चाप्टर 1’शी संबंधित धार्मिक वादामुळे त्याला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार म्हैसूर येथील चामुंडेश्वरी मंदिर येथे जाऊन प्रार्थना करावी लागली.
मंगळवारी सकाळी रणवीर सिंह मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मंदिरातील त्याच्या भेटीदरम्यान कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. पहाटे मुंबई विमानतळावर दिसलेल्या रणवीरने म्हैसूरमधील मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करेपर्यंत चेहऱ्यावर मास्क लावला होता. मंदिरात त्याने देवी चामुंडेश्वरीची विशेष पूजा करून प्रार्थना केली.
या भेटीमागे ‘कांतारा : चाप्टर 1’ चित्रपटाशी संबंधित वाद असल्याचे सांगितले जात आहे. गोवा सरकारद्वारे आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रणवीरने चित्रपटातील चावुंडी देवीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ‘इफ्फी’च्या मंचावर त्याने देवीचा उल्लेख ‘भूत’ असा केल्याचा आरोप करण्यातआला होता. या वक्तव्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
हे प्रकरण न्यायालयात Ranveer Singh पोहोचल्यानंतर 24 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत रणवीरच्या वकिलांनी न्यायालयात भूमिका मांडली. रणवीरचे वकील साजन पूवैय्या यांनी सांगितलं की, अभिनेता माफी मागणारे प्रतिज्ञापत्र सादर करेल आणि देवीची क्षमा मागण्यासाठी मंदिरालाही भेट देईल. मात्र तक्रारदार पक्षाच्या वकिलांनी रणवीरची सोशल मीडियावरील माफी वरवरची असल्याचा दावा केला. “त्याचे सोशल मीडिया अकाऊंट व्यवस्थापक सांभाळतो. त्यामुळे त्याने प्रत्यक्ष मंदिरात जाऊन माफी मागावी,” अशी मागणी त्यांनी केली होती.यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने रणवीरला चार आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याचे निर्देश दिले होते. अखेर न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत रणवीरने मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं.दरम्यान, ‘डॉन 3’ चित्रपटातून माघार घेतल्यामुळे रणवीरवर FWICE ने घेतलेल्या कारवाईमुळेही बॉलिवूडमध्ये चर्चा रंगल्या आहेत. अभिनेता आणि निर्मात्यांमधील करार, जबाबदाऱ्या आणि इंडस्ट्रीतील शिस्त या मुद्द्यांवर आता पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.