भोपाळ,
Suicide of an IPS Officer's Daughter मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील उच्चभ्रू चार इमली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्य पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी संजीव कांचन यांच्या १७ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजीव कांचन जेवणासाठी घरी आले असता त्यांना मुलगी खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. मृत विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती.
घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नसल्यामुळे आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हबीबगंज पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मुलीचा मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल माहितीची तपासणी केली जात असून तिच्या संपर्कातील व्यक्तींबाबतही माहिती गोळा केली जात आहे.तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, ही मुलगी संजीव कांचन यांनी सुमारे १६ वर्षांपूर्वी कायदेशीर प्रक्रियेद्वारे दत्तक घेतली होती. तसेच घरात पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या कौटुंबिक वातावरणाचा मुलीच्या मानसिक स्थितीवर काही परिणाम झाला होता का, याचाही तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.