मुंबई
Swadeshi Market दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील ११७ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘स्वदेशी मार्केट’च्या पुनर्विकासाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वदेशी मार्केटच्या पुनर्विकासाबाबत सरकार सकारात्मक असून, या प्रक्रियेत कोणत्याही सदस्याला किंवा व्यापाऱ्याला त्रास होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
काळबादेवी येथील स्वदेशी मार्केटच्या ११७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार या पुनर्विकास प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. ऐतिहासिक वारसा जपत Swadeshi Market आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे मार्केट उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.स्वदेशी चळवळीशी निगडित असलेल्या या मार्केटचा इतिहास स्वातंत्र्यलढ्याशी जोडलेला आहे. विदेशी वस्तूंविरोधात आंदोलन करताना हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यसैनिक बाबू गेनू यांच्या कार्याचा उल्लेख करत चव्हाण यांनी स्वदेशी विचारसरणी आजही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. गेली अनेक दशके स्वदेशी मार्केटने हा वारसा जपला असून, भविष्यातही त्याचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित राखले जाईल, असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात स्वदेशी मार्केटच्या ११७ वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करणाऱ्या विशेष पोस्टल कव्हरचे प्रकाशनही करण्यात आले. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेचा उल्लेख करत भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
चर्चा सुरू होती
दरम्यान, स्वदेशी मार्केटच्या Swadeshi Market पुनर्विकासाचा विषय गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. जुन्या आणि धोकादायक अवस्थेतील इमारतीमुळे व्यापारी आणि रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली होती. काही महिन्यांपूर्वी या पुनर्विकासावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याने प्रकल्प रखडल्याचेही समोर आले होते. इमारतीची अवस्था धोकादायक झाल्याने पालिकेकडून काही भागांचे पाडकामही करण्यात आले होते.कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढा, स्वदेशी मार्केटचे अध्यक्ष सुमित मेहरा, नवी मुंबई पोस्टमास्तर जनरल सुचित्रा जोशी तसेच स्थानिक पदाधिकारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.