सिंदी (रेल्वे),
car bike accident येथील सुभाष प्राथमिक शाळेजवळ बुधवार २७ रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तर धडक दिल्यानंतर कार अनियंत्रित होऊन शाळेच्या संरक्षक भिंतीवर आदळली. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत ऊर्फ दादू सोनुले (३५) हे एम. एच. ३२ ए. यू १७१८ क्रमांकाच्या दुचाकीने बस स्थानकाकडून घराकडे जात होते. दरम्यान, सेलडोहकडून वेगाने येणार्या एम. एच. ०१ सी. पी. ०८७२ क्रमांकाच्या कारने सुभाष प्राथमिक शाळेजवळ दुचाकीला धडक दिली. धडक होताच दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकल्या गेली. यात प्रशांत सोनुले गंभीर जखमी झाले. तर अपघातानंतर कार अनियंत्रित होत शाळेच्या संरक्षक भिंतीवर जाऊन धडकली. त्यामुळे भिंतही कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी पंकज घोडे घटनास्थळी पोहोचले. जखमी प्रशांत सोनुले यांना सिंदी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद सिंदी पोलिसांनी घेतली आहे.