"त्याच्या" डोळ्या देखत स्वप्नांची राख रांगोळी

-रेल्वे मजुरांनी लावलेली आग शेतात पोहचली -धानाचे 130 पोते व ट्रॅक्टर जळून खाक, 12 लाखाचे नुकसान!

    दिनांक :27-May-2026
Total Views |
मोहाडी,
peddy burnt घाम गाळून त्याने शेत पिकविले! मळणी करून विकायला न्यायची म्हणून धानाचे पोते शेतातच ठेवले. परंतु त्याचे सर्व स्वप्न एका क्षणात जळून खाक झाले. रेल्वे रुळाच्या बाजूला स्वच्छता करून मजुरांनी लावलेली आग शेजारच्या शेतात पोहोचली आणि धानाचे 130 पोते, एक ट्रॅक्टर जळून कोळसा झाले. डोळ्या देखत झालेली स्वप्नांची राख रांगोळी पाहून शेतकरीही गर्भगळीत झाला. बिरबल गोटेफोडे असे या आभागी शेतकऱ्याचे नाव आहे.
 

-धानाचे 130 पोते व ट्रॅक्टर जळून खाक 
 
 
मोहाडी तालुक्यातील नरसिंगटोला (देव्हाडा बु ) येथील बिरबल गोटेफोडे या शेतकऱ्याच्या बाबतीत घडलेली ही घटना केलेल्या कष्टाला वाकुल्या देणारीच आहे. बिरबल यांच्या शेताच्या शेजारून रेल्वे रूळ जातात. रेल्वे रूळ परिसरात आज 27 रोजी रेल्वेच्या मजुरांनी स्वच्छता केली. निघालेला कचरा त्यांनी दुपारच्या सुमारास जाळला. कडाक्याचे ऊन्ह आणि वारा यामुळे ही आग पसरत गेली आणि शेजारी असलेल्या बिरबल यांच्या शेतात पोहचली. त्यांच्या शेतात मळणी करून ठेवलेले 200 हून अधिक धानाचे पोते रचून ठेवले होते. या शेजारी एक ट्रॅक्टर पण उभा होता. पसरलेल्या आगीने धानाच्या पोत्यांना आणि ट्रॅक्टरला आपल्या कवेत घेतले. हा प्रकार लक्षात येऊन मदत कार्य सुरू होईपर्यंत धानाचे 130 पोते जळून खाक झाले होते. ट्रॅक्टर ही या अग्निकांडात पूर्णपणे जळाले. घटनेची माहिती मिळताच शेतकरी आणि गावकरी शेतात पोहोचले. याचवेळी तुमसर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली.peddy burnt अग्निशमन विभागाच्या गाडीने येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत जवळपास 12 लाखाचे नुकसान शेतकऱ्याचे झाले होते. उद्या विक्री करून, आधी पैसे येतील अशी स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याला डोळ्यादेखत त्याच्या कष्टाची राख रांगोळी होताना पहावी लागली. यावेळी शेतकरी पूर्णपणे हतबल दिसत होता. रेल्वे मधुरांच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्यावर ओढविलेला हा प्रसंग वर्षभराच्या प्रपंचाला बाधित करणारा आहे.