लाहौल-स्पिती,
Threat of glacial lake Sissu लाहौल-स्पितीतील सिसू गाव आता पूर्वीसारखे शांत राहिलेले नाही. अटल बोगदा सुरू झाल्यानंतर येथे पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे आणि हे गाव पर्यटनाचे केंद्र बनले आहे. मात्र या विकासाच्या मागे आता एक गंभीर नैसर्गिक धोका उभा राहत आहे. गावाच्या उंच भागात असलेले घेपन हिमनदी सरोवर दरवर्षी झपाट्याने विस्तारत असून, शास्त्रज्ञांनी त्याला भविष्यातील संभाव्य आपत्तीचा इशारा दिला आहे. हे सरोवर सुमारे ४,००० मीटरपेक्षा अधिक उंचीवर आहे आणि गेल्या काही दशकांत त्याचा आकार लक्षणीय वाढला आहे. हिमनदी वेगाने वितळत असल्याने पाण्याचा साठा वाढत आहे आणि याच प्रक्रियेमुळे धोका अधिक गडद होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हे सरोवर कधी फुटले तर केदारनाथसारख्या भीषण आपत्तीची पुनरावृत्ती सिसू परिसरात होऊ शकते.
तर विध्वंस होणार
शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार, १९८९ मध्ये या सरोवराचे क्षेत्रफळ मर्यादित होते, मात्र २०२२ पर्यंत ते अनेक पटींनी वाढले आहे. हिमनदी मागे सरकत असून, पावसाचे वाढते प्रमाण आणि तापमानातील वाढ यामुळे वितळण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. यामुळे सरोवराचा पाणीसाठा सातत्याने वाढत आहे. धोक्याची तीव्रता इतकी आहे की, सर्वात वाईट परिस्थितीत सरोवर फुटल्यास अवघ्या काही मिनिटांत पाण्याचा लोंढा सिसू गावात पोहोचू शकतो. या पुरासोबत मोठे दगड, गाळ आणि बर्फाचे तुकडे येऊन मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याची शक्यता आहे. मनाली–लेह महामार्ग, अटल बोगदा आणि आसपासची पर्यटन व्यवस्था यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
संपूर्ण हिमालयीन पट्टा धोक्यात
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि विविध संशोधन संस्थांनी हे क्षेत्र अत्यंत संवेदनशील असल्याचे स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी प्रारंभिक चेतावणी प्रणाली बसवण्यात आली असली तरी, स्थानिक पातळीवर सायरन, स्पष्ट स्थलांतर मार्ग आणि पूर्ण आपत्कालीन तयारी अजूनही अपुरी आहे. दरम्यान, पर्यटनामुळे गावाचा विकास झाला असला तरी पर्यावरणीय संतुलन बिघडत असल्याचे चित्र समोर येत आहे. वाढते तापमान, हवामान बदल आणि हिमनद्यांचे झपाट्याने होणारे वितळणे हे हिमालयासाठी मोठे आव्हान ठरत आहे. सिसू गावाची ही स्थिती केवळ एका ठिकाणाची नाही, तर संपूर्ण हिमालयीन पट्ट्यासाठी गंभीर इशारा मानली जात आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास हा धोका भविष्यात मोठ्या आपत्तीत रूपांतरित होऊ शकतो.