अबब... जिल्ह्यात 30 गावांत पाणी टंचाईची झळ

    दिनांक :27-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal water crisis,  जिल्ह्यातील 30 गावांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. प्रशासनाकडून या गावांना 22 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सातत्याने वाढत असलेल्या उष्णतेमुळे येत्या काही दिवसांत आणखी काही गावातील नागरिकांना टँकरच्या पाण्यानेच तहान भागविण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
 

Yavatmal water crisis, 
जिल्ह्यात यंदा उन्हाने कहर केला आहे. मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे तसेच विहिरी पूर्णत: आटल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची वाताहत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.
अशा परिस्थितीत Yavatmal water crisis पाणीटंचाई कृती आराखड्यातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. एप्रिल महिन्यात मोजक्याच गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. मे महिन्यात मात्र टँकरची संख्या प्रचंड वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण 30 गावांत 22 टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. सर्वाधिक पुसद तालुक्यातील 7 गावांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील 113 गावांत 11 बोअरवेल, तर 102 खाजगी विहीर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
 
यात आर्णी 13, यवतमाळ 11, घाटंजी 20, बाभुळगाव 7, राळेगाव, झरीजामणी प्रत्येकी 1, उमरखेड 8, नेर 13, वणी 4, दिग्रस 17, कळंब 9, दारव्हा 5, अशा मिळून 109 गावांचा समावेश आहे. येत्या काळात उन्हाची अशीच परिस्थिती राहिल्यास आणखी विहीर अधिग्रहणात वाढ होण्याची शक्यता आहे.
 
प्रामुख्याने येलदरी, बुटी (ईजारा), कारला, वेणी खुर्द, रामपूर नगर, वडसद, ब्राम्हणगाव, इत्यादी गावे आहेत. तर आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेडा, पाळोदी, इचोरा, दहेली, सुधाकरनगर, यवतमाळ तालुक्यातील खरोला खुर्द, पांढरी, किटा, घाटंजीमधील निबर्डा (तिजसाळा), पांढुर्णा बुद्रुक, इंझाळा (बेघर बेडा), नेरमधील आजंती, बाभुळगावचे सारफळी, दारव्हातील करजगाव, तर उमरखेड तालुक्यातील हिरामननगर (निंगनूर) आदी गावातील 30 हजार 590 नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
येत्या आठवडाभर उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पाणीटंचाई आणखी भेडसावण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचे आगमन लवकरच झाल्यास पाणी टंचाईपासून नागरिकांना दिलासा मिळेल.