गोरेगाव बस स्थानक चौकातील प्रकार : नगर पंचायतीचे दुर्लक्ष
गोंदिया,
ashok stambha : atikraman भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून ओळखला जाणारा अशोक स्तंभ हा देशाच्या संविधानिक मूल्यांचा, न्यायव्यवस्थेचा आणि राष्ट्राच्या एकात्मतेचा गौरवशाली प्रतीक मानला जातो. असे असताना गोरेगाव शहरातील मुख्य बस स्थानक चौकात नगरपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेली अशोक स्तंभाची प्रतिकृती आज अतिक्रमण, अस्वच्छचेच्या विळख्यात सापडून आपली ओळख गमावत असल्याचे चित्र समोर येत आहे. असे असताना याकडे नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
ashok stambha : atikraman गोरेगाव येथील बसस्थानक चौक हा अत्यंत महत्त्वाचा आणि गर्दीचा परिसर आहे. या चौकात हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व प्रवासी दररोज ये-जा करतात. अशा प्रमुख ठिकाणी उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतीकाच्या अवतीभोवती सध्या हातगाड्या, फेरीवाले आणि तात्पुरती दुकाने मोठ्या प्रमाणात लावली जात आहेत. काही व्यापार्यांनी तर थेट अशोक स्तंभासमोरच दुकाने उभारल्यामुळे या राष्ट्रीय प्रतीकाचे अस्तित्वच झाकले जात आहे. याशिवाय स्तंभाभोवती मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक, सांडपाणी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात दुर्गंधी पसरत असून राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाच्या ठिकाणीच अस्वच्छतेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे या प्रतीकाची गरिमा, प्रतिष्ठा आणि पवित्रता धोक्यात आल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, नगरपंचायत प्रशासनाने वेळोवेळी अतिक्रमण हटविण्याच्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे फेरीवाल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी चौकातील वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अतिक्रमणमुक्त करून सुशोभीकरण करा...
शहरातील सुजाण नागरिकांनी अशोक स्तंभ परिसर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त करून तेथे स्वच्छता, सुशोभीकरण आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय प्रतीकाचा सन्मान राखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.