चारचाकी लपवताहेत, उत्पन्न दडवताहेत

    दिनांक :28-May-2026
Total Views |
-शहरातील जनगणनेचा ग्राऊंड रिपोर्ट
-उच्चभ्रू कॉलनीतील दारे बंद
-46 अंश तापमानात शिक्षक घामाघूम
-जनगणना कर्मचाऱ्यांना अविश्वासाचे धक्के
 
नागपूर, 
Census नागपुरात 46 अंश सेल्सिअस तापमानात जनगणनेचे महाअभियान सुरू आहे. शहरातील ग्राऊंड रिपोर्ट सांगतो की, जनगणना कर्मचाऱ्यांसमोर अविश्वास, प्रवेश नाकारणे, अंगाची लाही लाही करणारे ऊन अशी तिहेरी आव्हाने उभी आहेत. इन्कम टॅक्सची चौकशी होईल, बीपीएल कार्ड रद्द होईल या भीतिपोटी नागरिक उत्पन्न व संपत्तीची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.
 
 
Census
 

उच्चभू्र भागात संशय; वस्त्यांमध्ये आपलेपणा
धरमपेठ, रामदासपेठ, लक्ष्मीनगर, त्रिमूर्तीनगरसारख्या उच्चभू्र कॉलनींमध्येे जनगणना पथकाला दारातच रोखले जात आहे. सुरक्षा रक्षक दारातच, साहेब घरी नाहीत किंवा ऑनलाईन भरली आहे, असे सांगून परत पाठवीत आहेत. काही नागरिक चुकीचे मोबाईल नंबर देऊन वेळ मारून नेत आहेत, जेणेकरून पुन्हा संपर्क होऊ नये. याउलट महाल, इतवारी, सक्करदरा, मानेवाडा, नरसाळा या जुन्या वस्त्या व मध्यमवर्गीय भागात चित्र आशादायक आहे. येथे नागरिक माहिती देत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक अधिक सहकार्य करीत आहेत. शिक्षक आहात, तुम्ही खोटे बोलणार नाही’ असे सांगून अनेक जण घरात बोलावून पाण्याचा ग्लास देतात. मात्र तरुण वर्गात संशयाचे वातावरण आहे. ‘डिजिटल फ्रॉडचे प्रमाण वाढले आहे, तुम्ही खरे कशावरून,’ असा थेट सवाल करून ओळखपत्राची मागणी केली जाते. ओळखपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करून खात्री पटल्यानंतरच माहिती दिली जाते.
‘इन्कम टॅक्स’ची भीती; कार लपवून दुचाकी सांगतात
जनगणनेच्या प्रश्नावलीत कुटुंबातील सदस्य संख्या, जात, धर्म यासोबतच उत्पन्न, चारचाकी वाहन, घर, शेती यांसारख्या चल व अचल संपत्तीची माहिती विचारली जात आहे. यामुळेच नागरिकांमध्ये संशय व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, सरकारच्या वेगवेगळ्या विभागांकडे आमची सर्व माहिती आधीच आहे. मग पुन्हा पुन्हा का विचारली जाते? उद्या इन्कम टॅक्सची नोटीस आली तर कोण जबाबदार? कर्मचाèयांनी सांगितले की, अनेक कुटुंबांकडे चारचाकी वाहन असूनही आमच्याकडे फक्त दुचाकी आहे, असे सांगितले जात आहे. बीपीएल कार्ड बंद होईल, वृद्धापकाळाची पेन्शन बंद होईल, या भीतीने आर्थिक माहिती दडवली जात आहे.
46 अंश तापमानात कर्मचारी कर्तव्यावर
Census  शहरातील 46 अंश तापमानात सकाळी साडेसहा वाजताच आम्ही घराबाहेर पडतो. दुपारी एक वाजेपर्यंत उन्हातान्हात फिरावे लागते. घसा कोरडा पडतो, डिहायड्रेशनचा त्रास होतो, असे एका जनगणना कर्मचाऱ्याने सांगितले. दुसèया एका शिक्षिकेने व्यथा मांडली की, माझ्याकडे जवळपास 900 लोकांचा डेटा गोळा करण्याची जबाबदारी आहे. प्रत्यक्षात दिवसाला केवळ 10 ते 12 घरेच पूर्ण होतात. एका कुटुंबाला जनगणनेचे महत्त्व पटवून द्यायला आणि फॉर्म भरायला किमान अर्धा तास लागतो. अनेक कर्मचाèयांना ताप, अशक्तपणा, उलट्या यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरीही कर्तव्यात कसूर केल्यास सस्पेंशन होईल, या भीतीने ते रजेवर जाऊ शकत नाहीत.
प्रमुख अडथळे
-सर्व्हर डाऊन- जनगणनेचे मोबाईल अ‍ॅप वारंवार बंद पडते. एका कुटुंबाचा फॉर्म भरण्यासाठी तासभर ताटकळत राहावे लागते
-ऑनलाईन चुका- अनेक नागरिकांनी स्वतः रजिस्ट्रेशन केले, पण माहिती चुकीची भरली. त्यामुळे आशा वर्कर्स व शिक्षकांना पुन्हा दुरुस्ती करावी लागत आहे.
-जागरूकतेचा अभाव- ग्रामीण व काही शहरी भागात जनगणना सुरू आहे, हेच माहीत नाही. आधी महत्त्व समजावून सांगावे लागते, वेळ वाया जातो.
-चुकीचे संपर्क- नागरिक जाणूनबुजून चुकीचे मोबाईल नंबर देतात. पडताळणीसाठी पुन्हा भेट द्यावी लागते.