एमगिरी चमूची निरीक्षण
सकारात्मक परिणामाची शक्यता
चिखलदरा,
Coffee Production कॉफी उत्पादनावर कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, राज्य शासनाच्या कृषी विभागाद्वारे अभ्यास, संशोधन होणे गरजेचे असताना केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एमगिरीच्या चमूने चिखलदर्याच्या स्फूर्ती क्लस्टर संस्थेने दिलेल्या प्रस्तावावर कॉफी उत्पादन आणि संशोधन प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. संस्थेचे कार्य निदेशक डॉ. आशुतोष मुरकुटे. डॉ. आदर्शकुमार अग्निहोत्री, डॉ. शितल शर्मा यांचे प्रत्यक्ष निरीक्षण सुरू झाले आहे.
चिखलदर्यात यापूर्वीच ६५ हेक्टर वरती उत्पादीत कॉफीतून सौंदर्यप्रसाधने तयार करण्यात आली असून स्थानिक ६० महिला बचत गटांना सदरील दहा प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचे वाटप प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले होते. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रत्येक महिलेकडून गुगल फॉर्म भरून सौंदर्यप्रसाधनाबाबत सूचना व आवड याबाबत प्रतिक्रिया घेण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना स्वतंत्ररित्या पत्र व्यवहार करून कॉफी उत्पादन वाढी संदर्भात व त्यातून रोजगार निर्मिती बाबत स्फूर्ती योजनेअंतर्गत प्रकल्पहाती घेण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत.
स्थानिक वनविभाग, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे व राजाश्रयाच्या दुर्लक्षतेमुळे महाराष्ट्रात एकमेव चिखलदार येथे उत्पादित होणार्या कॉफीचे उत्पादन वाढ होत नसाल्याची खंत पर्यटक व्यक्त करीत होते. परंतु, पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती आणि कृषी विभाग, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी , गाविलगड रेंज फॉरेस्ट ऑफिसर व उपविभागीय कार्यालय परतवाडा वनविभाग यांच्याकडे विविध प्रकारचे प्रस्ताव कॉफी उत्पादनात वाढ व्हावी करिता देण्यात आले. स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टीने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे कार्यालयाद्वारे नाविन्यपूर्ण योजनेतून मधाचे गाव आमझरी गार्डन या ठिकाणी नेचर कॅफे करिता ७७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यालाच पूरककार्य होणे गरजेचे असल्याने स्फूर्ती क्लस्टर खादी ग्राम उद्योग आयोग यांचे द्वारे महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था वर्धा या स्वायत्त्य संस्थेस संचालक स्फूर्ती क्लस्टर यांनी दिलेला प्रस्ताव कॉफी उत्पादन आणि संशोधन मूल्यवर्धन यासाठी स्वीकृत करण्यात आला व त्याकरिताच चिखलदरा कॉफीवरती आरएनडी प्रकल्पास भारत सरकारच्या उरोक्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. देण्यात आली असून विशेष निधी या कार्याकरिता एमगिरी वर्धा संस्थेस हस्तांतरित करण्यात आला आहे.
Coffee Production एमगरी संस्थेच्या वन उत्पादन व मूल्यवर्धन विभागाने चिखलदराच नव्हे तर मध्य प्रदेशातील कुकरू गावाला भेट देऊन तेथील ४४ हेक्टर वरील कॉफी उत्पादनाचे स्त्रोत समजावून घेतले आहे. चिखलदर्यातील दुर्लक्षित कॉफीचे नमुने प्रकाश होमस्टे आमझरी गार्डन, खटकाली, मयमपूर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन संकलीत करण्यात आले आहे. चिखलदरा कॉफीला जिओ टॅग मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्य सुरू केले आहे. याबाबतची माहिती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास सिद्धार्थ शुक्ला यांना देण्यात आली. एमगिरीच्या चमूने स्थानिक शेतकरी, कॉफी विक्रेते यांची भेट घेऊन प्रतिक्रिया जाणून घेतल्या. एमगिरीच्या चमूसोबत स्फूर्ती क्लस्टरचे संचालक सुनील भालेराव होते.