चालू कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का

    दिनांक :28-May-2026
Total Views |
बाप-लेकाचा जागीच मृत्यू
इंदिरानगरमधील घटना
 
चंद्रपूर, 
Electric shock from a running cooler चालू कुलरमध्ये पाणी टाकताना बाप-लेकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवार, 28 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास येथील इंदिरा नगर परिसरात घडली. वामन मांडवे (60) व राहुल मांडवे (25) अशी मृत बाप-लेकाची नावे आहेत.
 
 
coolar
(संग्रहित छायाचित्र)
 
येथील इंदिरानगर रेल्वे पटरीजवळ राहणारे वामन मांडवे हे सकाळी चालू कुलरमध्ये पाणी टाकत होते. यावेळी अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का बसताच ते खाली कोसळले. वडील खाली पडल्याचे पाहून त्यांचा मुलगा राहुल मांडवे हा तातडीने त्यांच्या मदतीसाठी धावला. मात्र, वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात राहुललाही विजेचा तीव्र धक्का बसला. या भीषण दुर्घटनेत बाप-लेकाचा जागीच मत्यू झाला. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या दुर्देवी प्रकारामुळे संपूर्ण इंदिरानगर परिसरात शोककळा पसरली असून, मांडवे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
 
 
Electric shock from a running cooler  दरम्यान, जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेमुळे कुलर, एसी आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उन्हाळ्यापूर्वीच महावितरणकडून नागरिकांना विजेच्या सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. कुलरची वायरिंग योग्य प्रकारे तपासून घ्यावी, अर्थिंग व्यवस्थित असावी तसेच सुरू असलेल्या कुलरमध्ये पाणी टाकताना प्रथम वीजपुरवठा बंद करावा, अशा सूचना महावितरणने दिल्या आहेत.