मोबाईलवर फोटो काढून दंड वसुली

ई-चालान मशिनचा वापर का नाही? वाहतूक पोलिसांच्या कारभारावर गंभीर आरोप

    दिनांक :28-May-2026
Total Views |
नागपूर
E-Challan नागपूर शहर वाहतूक शाखेकडे अत्याधुनिक 100 ई-चालान मशिन्स उपलब्ध असतानाही काही वाहतूक अंमलदारांकडून खाजगी मोबाईलवर वाहनांचे फोटो काढून दंड वसूल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दंड घेतल्यानंतर पावती दिली जात नसल्याने कारवाईच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे प्रामाणिक वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी असून संपूर्ण विभागाची बदनामी होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
 
e-challan machine
 
E-Challan  शहरात दररोज 15 लाखांहून अधिक वाहने रस्त्यांवर धावतात. त्यातील हजारो वाहनधारक सिग्नल तोडणे, नो-पार्किंग, ट्रिपल सीट, हेल्मेट न घालणे, ‘पीयूसी’ नसणे अशा नियमांचे उल्लंघन करतात. अपघात रोखण्यासाठी व शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांना ई-चालान मशिन्स देण्यात आल्या. या मशिन्समुळे वाहन क्रमांक टाकताच मागील दंड, वाहनाची माहिती स्क्रीनवर येते. दंड भरल्यावर लगेच एसएमएस व डिजिटल पावती मिळते. दंड थेट शासनाच्या खात्यात जमा होतो. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे.
 
E-Challan  अनेक चौकांत अंमलदार ई-चालान मशीन न वापरता स्वतःच्या मोबाईलवर फोटो काढतात. त्यानंतर ऑनलाईन दंड 1000 रुपये होत असेल तर 500 रुपयांमध्ये तडजोडीस तयारी दर्शविली जाते. पैसे घेतल्यानंतर पावती मागितल्यास मशीनमध्ये नेटवर्क नाही, पावती संपली अशी कारणे दिली जातात. वाहतूक तज्ज्ञ सांगतात की, पारदर्शकता नसेल तर दंडाचा धाक राहत नाही. वाहनचालकांना असा समज होऊन जातो की, पैसे देऊन प्रकरण मिटते. त्यामुळे नियमभंगाचे प्रमाण वाढते.
E-Challan वरिष्ठांनी लक्ष द्यावे
काही पोलिस अंमलदारांच्या अशा कृत्यांमुळे संपूर्ण वाहतूक विभागाच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. प्रामाणिकपणे काम करणाèया पोलिसांवरूनही नागरिकांचा विश्वास उडत आहे. या प्रकाराची वरिष्ठ पोलिस अधिकाèयांनी गंभीर दखल घ्यावी आणि दोषी अंमलदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागपूरकर करीत आहेत. ई-चालान मशीनचा सक्तीने वापर करण्याचा आदेश द्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.