ओटावा,
indian student murdered in canada कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील बोरसाड येथील २२ वर्षीय विद्यार्थिनी विधी मेघा हिची नायगारा परिसरात चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या सीमेजवळ तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
विधी मेघा ही उच्च शिक्षणासाठी काही महिन्यांपूर्वी कॅनडात गेली होती. शिक्षणाबरोबरच स्वतःचा खर्च भागवण्यासाठी ती नोकरीही करत होती. भविष्यात कॅनडामध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी (PR) अर्ज करण्याची तिची तयारी सुरू होती. मात्र, १५ मेपासून ती अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच माहिती मिळत नव्हती. अखेर नायगारा परिसरात तिचा मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. कॅनेडियन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये टोरोंटो विद्यापीठाच्या स्कारबरो कॅम्पसजवळ भारतीय पीएचडी विद्यार्थी शिवांक अवस्थी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.indian student murdered in canada तसेच एप्रिल २०२५ मध्ये हॅमिल्टन येथे हरसिमरत रंधावा या भारतीय विद्यार्थिनीचा गोळीबारात मृत्यू झाला होता. त्याआधी डिसेंबर २०२४ मध्ये एडमंटन येथे हर्षदीप सिंग अंताल या भारतीय विद्यार्थ्याचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या सलग घडणाऱ्या घटनांमुळे परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून भारत सरकारनेही या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.