दुबई,
Womens T20 World Cup आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी आयसीसीने सामना अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली असून यामध्ये चार भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेला १२ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार असून उद्घाटनाचा सामना यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जाणार आहे. आयसीसीने गट फेरीतील सामन्यांसाठी एकूण १४ पंच आणि चार सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे महिला टी-२० विश्वचषकाच्या सलग तिसऱ्या आवृत्तीत सर्व सामना अधिकारी महिला असणार आहेत. या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण ३३ सामने खेळवले जाणार आहेत.
२०२४ च्या मागील विश्वचषकात काम पाहिलेल्या नऊ अधिकाऱ्यांचा यंदाच्या पॅनेलमध्येही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची क्लेअर पोलोसाक या सर्वात अनुभवी पंच ठरल्या असून त्या महिला टी-२० विश्वचषकात सहाव्यांदा पंचगिरी करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत २२ सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. Womens T20 World Cup त्यांच्यानंतर जॅकलिन विल्यम्स आणि किम कॉटन यांचा क्रमांक लागतो. भारतीय महिलांमध्ये अनुभवी सामनाधिकारी जी.एस. लक्ष्मी यांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत जननी एन, वृंदा राठी आणि गायत्री वेणुगोपालन या भारतीय पंचांचीही निवड करण्यात आली आहे. भारतीय महिलांना मिळालेल्या या संधीमुळे भारतीय क्रिकेटसाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.