निळोणा धरणावर ‘लिटील टर्न’चे यशस्वी प्रजनन

    दिनांक :28-May-2026
Total Views |
प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे परदेशी पाहुण्यांचे घरटे सुरक्षित

यवतमाळ, 
Little Tern Bird यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे निळोणा धरण परिसरातील ‘लिटील टर्न’ या परदेशी पाहुण्यांचे घरटे सुरक्षित झाले आहे. निळोणा धरणावरील छोट्याशा नैसर्गिक बेटावर ‘लिटील टर्न’ या स्थलांतरित जलपक्ष्याच्या तब्बल 12 हून अधिक घरट्यांची नोंद पक्षी अभ्यासक डॉ. प्रवीण जोशी यांनी केली होती. या घरट्यांमध्ये सहा पिलेदेखील आढळून आली होती. मात्र धरण परिसरात सुरू असलेल्या उत्खननामुळे, गुरांच्या वावरण्यामुळे तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हालचालींमुळे या दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजनन स्थळाला गंभीर धोका निर्माण झाला होता.
 
 
Little Tern Bird
 
ही बाब डॉ. जोशी यांनी तातडीने जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या निदर्शनास आणून दिली. पर्यावरण व जैवविविधतेप्रती संवेदनशील भूमिका घेत जिल्हाधिकाèयांनी त्वरित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांना योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे व्यवहारे यांनी स्वतः निळोणा धरणावर भेट देत प्रजनन स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर संबंधित अधिकाèयांना त्या बेटाभोवती तातडीने कुंपण उभारून परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे आदेश देण्यात आले. अवघ्या एका दिवसात संपूर्ण क्षेत्र संरक्षित करण्यात आले.
 
 
Little Tern Bird  प्रशासनाच्या या जलद व सकारात्मक कृतीमुळे या परदेशी पाहुण्या पक्ष्यांची पुढील पिढी सुरक्षित झाली आहे. पर्यावरणप्रेमी व पक्षी अभ्यासकांकडून या उपक्रमाचे राज्यभर कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील अन्य धरणे, जलाशय व बेटांवरही अशाच पद्धतीने संवेदनशीलता दाखविली गेली, तर अनेक जलपक्ष्यांची प्रजननस्थळे नष्ट होण्यापासून वाचू शकतील, असे मत डॉ. प्रवीण जोशी यांनी व्यक्त केले. ‘लिटील टर्न’ हा आकाराने लहान पण अत्यंत चपळ जलपक्षी असून मराठीत त्याला ‘छोटा सुरय’ असे संबोधले जाते. हा पक्षी प्रामुख्याने युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील काही भागांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करत भारतीय उपखंडात येतो. स्थलांतरादरम्यान तो समुद्रकिनारे, नदीपात्रे, खारफुटी भाग तसेच अंतर्देशीय धरण परिसरांचा वापर विश्रांती व प्रजननासाठी करतो. भारतातील अंतर्देशीय जलाशयांमध्ये याचे यशस्वी प्रजनन अत्यंत कमी प्रमाणात नोंदविले जाते. त्यामुळे निलोणा धरणावरील ही नोंद वैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

संयुक्त जबाबदारी
जैवविविधता जपणे ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून समाज व प्रशासनाची संयुक्त जबाबदारी आहे. योग्यवेळी केलेल्या छोट्या हस्तक्षेपामुळे मोठे पर्यावरणीय परिणाम साधता येतात, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विकास मीना यांनी व्यक्त केले. तर कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांनी निसर्ग संवर्धनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्रशासन सदैव तत्पर राहील, असे सांगितले.