गडचिरोली,
maoist arms गडचिरोली पोलीस आणि नारायणपूर (छत्तीसगड) पोलीस यांच्या संयुक्त आंतरराज्यीय अभियानात माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
ऑपरेशन ‘अंतिम प्रहार’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत १ इन्सास रायफल, २ सिंगल शॉट रायफल, २ बारा बोअर रायफल आणि १८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच २५ किलो आयईडी स्फोटक, २ क्लेमोर, ११० डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर, ५०० पेक्षा अधिक बीजीएल सेल, ७ बीजीएल लॉन्चर, ३ ट्यूब लॉन्चर आणि शस्त्रनिर्मितीसाठी वापरली जाणारी लेथ मशीन, मोटार, ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर, बॅटरी, सोलर प्लेट आदी साहित्यही हस्तगत करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली असली तरी सीमावर्ती दुर्गम जंगल परिसराचा वापर करून माओवादी शस्त्र व स्फोटक साहित्य लपवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुरक्षा दलांवर घातपात करण्याच्या उद्देशाने हे साहित्य वापरले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ मे रोजी विशेष अभियान पथक प्राणहिता, डीआरजी नारायणपूर आणि बीडीडीएस प्राणहिता यांच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. दि. २७ मे रोजी पोस्टे काकूर, जि. नारायणपूरपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावरील जंगलात ही कारवाई करण्यात आली.
शोधमोहीमेदरम्यान माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेले शस्त्रसाठा आणि शस्त्रनिर्मिती साहित्य उघडकीस आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच धोकादायक साहित्य नष्ट करण्यात आले.maoist arms ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे आणि नारायणपूरचे पोलीस उपअधीक्षक मनोज मंडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.