उन्हाच्या तळपत्या रणभूमीत संघर्षाची ठिणगी

३० तारखेपासून आमरण उपोषणाची घोषणा

    दिनांक :28-May-2026
Total Views |
अंतरवाली सराटी
Manoj Jarange Patil अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पुन्हा एकदा तीव्र वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत ३० तारखेपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
 

Manoj Jarange Patil 
अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की यावेळचे उपोषण अधिक कठोर स्वरूपाचे असेल आणि देशात आतापर्यंत झालेल्या आंदोलनांपेक्षा वेगळे असेल. “या वेळचं उपोषण रणरणत्या उन्हात होणार आहे. मी मंडपाखाली किंवा सावलीत बसणार नाही. थेट उन्हात बसून आंदोलन करणार आहे. मला उष्माघात झाला किंवा काही अनुचित घडलं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनाचा केंद्रबिंदू Manoj Jarange Patil  असलेल्या अंतरवाली सराटी परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी जरांगे पाटील यांनी स्वतः समाजबांधवांना आंदोलनस्थळी गर्दी न करण्याचे आवाहनही केले आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे भेट देत जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्या वेळी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र, त्यानंतर सरकारकडून कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तीव्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जबाबदारी निश्चित करत जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. वारंवार मुदत देऊनही निर्णय न झाल्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.३० तारखेपासून सुरू होणाऱ्या या आमरण उपोषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकार यावर कोणती भूमिका घेते याकडेही सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.