पुणे,
Mumbai Pune Expressway मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अवघड चढ-उतार, तीव्र वळणे आणि धोकादायक घाट भागातील अपघात कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प १ मे रोजी सुरू करण्यात आला असला तरीही बोरघाट परिसरातील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या केवळ पंधरा दिवसांत या भागात तीन भीषण अपघात घडले असून, त्यात आठ वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
बोरघाट परिसर हा नेहमीच अवजड आणि हलक्या वाहनांसाठी धोकादायक मानला जातो. अलीकडील अपघातांमध्ये एक वऱ्हाडाची गाडीही दुर्घटनेत सापडली. ठाणे जिल्ह्यातून जेजुरी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या या वाहनाचा बोरघाटात अपघात झाला. या घटनेनंतर आनंदाचा प्रवास क्षणात आक्रोशात बदलला. गाडीत असलेल्या आठ जखमींना तातडीने खालापूरजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.खोपोली बायपास हा भागही अपघातांसाठी ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात येथे तब्बल १६ अपघात झाले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६१ जण जखमी झाले आहेत. याशिवाय ढेकू गावाजवळील तीव्र उतार, फूडमॉल परिसर आणि अंडा पॉईंट परिसरातही सातत्याने अपघात होत असल्याने वाहनचालकांसाठी हा संपूर्ण घाटपट्टा अधिकच धोकादायक बनला आहे.
लोणावळा आणि खंडाळा परिसरातून Mumbai Pune Expressway घाट उतरताना अवजड वाहनांना सतत ब्रेक वापरावे लागतात. त्यामुळे ब्रेकचे ‘लाइनर’ अतिउष्ण होऊन काही वेळा ब्रेक निकामी होण्याच्या घटना घडतात. याच तांत्रिक कारणामुळे अनेक गंभीर अपघातांची नोंद झाली आहे. यापूर्वी ३ मार्च रोजी एका कंटेनरचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर २१ एप्रिल रोजी बॅटरी पॉईंटजवळ झालेल्या आणखी एका भीषण दुर्घटनेत तीन प्रवाशांचा जीव गेला होता.बोरघाटातील या सलग अपघातांमुळे ‘मिसिंग लिंक’सारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांनंतरही सुरक्षिततेचा प्रश्न कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात अपघातांची मालिका सुरूच राहिल्याने प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.