गोसेवेच्या नावाखाली गोरखधंदा ?
300 हून अधिक जनावरांचा हिशोब संशयात
पांढरकवडा,
pandharkavada kondawada Case पांढरकवडा नगर परिषदेच्या कोंडवाडा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे धक्कादायक आरोप समोर आल्याने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यांत पांढरकवडा पोलिसांकडून विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेली 300 हून अधिक जनावरे नगर परिषद कोंडवाड्यामध्ये जमा करण्यात आल्याची नोंद पोलिस दप्तरात असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मात्र आजघडीला प्रत्यक्ष किती जनावरे कोंडवाड्यात उपलब्ध आहेत, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचा आरोप होत आहे.
नुकत्याच झालेल्या कारवाईमध्ये आणखी 28 बैल जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. कोंडवाड्यात जनावरांना पुरेसा चारा, पाणी, सावली आणि वैद्यकीय सुविधा मिळत नसल्यामुळे अमानुष हेळसांड होत असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांच्या नेतृत्वात प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये कोंडवाड्यातील जनावरांच्या कथित विक्रीबाबत गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मांगुर्डा, गणेशपूर, आंबेझरीसह इतर गावांमध्ये काही जनावरांची विक्री झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला असून या संपूर्ण व्यवहाराची नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच बैलांना वाहनांमध्ये कोंबून नेत असताना पोलिसांनी जप्त केलेल्या काही वाहनांमधून डिझेल काढून त्याची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामध्ये शेकडो लिटर डिझेलचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या कोंडवाडा करारनाम्यानुसार मोकाट जनावरांची व्यवस्था करणे ही प्रमुख जबाबदारी असताना, प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात जप्त जनावरे ठेवण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. संबंधित ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनावरे ठेवण्याची क्षमता नसल्याचेही सांगितले जात आहे. जनावरांसाठी कायमस्वरूपी शेड, पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा अपुèया असल्याने प्राणी कल्याणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
pandharkavada kondawada Case गोसेवेच्या नावाखाली सुरू असलेला हा कथित गोरखधंदा नेमका कोणाच्या संरक्षणाखाली सुरू आहे, असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर ‘गोसेवक झाले का तस्कर’ असा प्रश्न विचारून संपूर्ण प्रकरणाची आर्थिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. युवा टायगर फोर्सने या कोंडवाडा प्रकरणाची उच्चस्तर चौकशी करावी, गेल्या सहा महिन्यांचा जनावरे व खर्चाचा लेखाजोखा जाहीर करावा, सीसीटीव्ही फूटेज जप्त करून नि:पक्ष तपास करावा, जनावरांच्या कथित विक्रीची स्वतंत्र चौकशी करावी, अशा मागण्या केल्या आहेत.
तसेच डिझेल गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करावेत, संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द करावे, दोषींना काळ्या यादीत टाकून फौजदारी कारवाई करावी, जनावरांसाठी कायमस्वरूपी चारा, पाणी व शेडची व्यवस्था करावी, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत कारवाई करावी, अशाही त्यांच्या मागण्या आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांनी दिला आहे.