अमरावती,
rain in amravati अमरावती शहर व आजुबाजुच्या परिसरात गुरूवारी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान वादळी पाऊस झाला. काही भागात बोराच्या आकाराची गार पडली. जवळपास अर्धातास हा पाऊस होता. पावसामुळे शहरात कोणतीही अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नाही. अमरावतीत तापमान वाढलेले असताना दुपारी २ वाजतापासून ढगाळ वातावरणाला सुरूवात झाली. ४.३० वाजताच्या दरम्यान चारही बाजुंनी ढग एकत्र आल्याने चांगलेच काळवंडले होते.
तेवढ्यातच जोरदार पाऊस सुरू झाला. वाराही सुटला. प्रचंड तापमानाने होरपळणार्या अमरावतीकरांना काही क्षणांसाठी का होईना. गारवा मिळाला. मातीचा सुंगधही दरवळला. नवसारी, कठोरा नाका, शेगाव नाका या भागामध्ये बोरा इतकी गार पडली. ठिकठिकाणी साचली होती. शहराच्या उर्वरीत भागात फक्त वादळी पाऊसच आला. तब्बल अर्धातास पावसाने हजेरी लावली. या कालावधीत शहरात कुठेच अनुचीत घटना घडल्याचे वृत्त नाही. पाऊस थांबल्यानंतर ढगाळ आणि स्वच्छ अशी आकाशाची स्थिती होती. ४४ ते ४७ अंशापर्यंतच्या तापमानाने हैरणा झालेल्या अमरावीतकरांना या पावसाने थोडासा दिलासा मिळाला. शुक्रवारी पुन्हा सुर्य नारायणाने आपले मुळस्वरूप धारण केले तर प्रचंड उकडा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. शहरा लगतच्या काही भागात तर काही तालुक्यांमध्येही पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे. हा पाऊस वार्यासह तुरळक स्वरूपात आला.