बेंगळुरू
Siddaramaia कर्नाटकच्या राजकारणात अखेर मोठा उलटफेर झाला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. काँग्रेस हायकमांडकडूनही सत्तांतराला हिरवा कंदील मिळाल्याचे संकेत मिळत होते. अखेर आज सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचे स्पष्ट करत राजकीय घडामोडींना निर्णायक वळण दिले.
सिद्धरामय्या यांनी सकाळी साडेदहा वाजता मंत्रिमंडळाची विशेष ब्रेकफास्ट बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्र्यांसोबत अनौपचारिक चर्चा सुरू असतानाच त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील काँग्रेसच्या सत्ताकारणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. बैठकीनंतर सिद्धरामय्या हे राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा अधिकृत राजीनामा सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण आले होते. मुख्यमंत्रीपदासाठी शिवकुमार यांचे नाव सातत्याने चर्चेत होते. पक्षांतर्गत समन्वय आणि सत्तेतील संतुलन राखण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने अखेर नेतृत्वबदलाचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार,Siddaramaia पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांना राज्यसभेची ऑफरही दिली होती. राष्ट्रीय राजकारणात त्यांना सक्रिय भूमिका देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.सिद्धरामय्या यांच्या निर्णयानंतर डीके शिवकुमार समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेंगळुरूसह राज्यातील विविध भागांत कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला असून आगामी शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसकडून लवकरच नव्या नेतृत्वाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कर्नाटकातील या सत्तांतरामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात होणार असून आगामी काळात काँग्रेसची रणनीती काय असेल, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.