विचारांचा अखंड धबधबा म्हणजे ‘वैनायक’!

स्वा. सावरकर जयंती विशेष

    दिनांक :28-May-2026
Total Views |
रेवती जोशी-अंधारे
 
नागपूर, 
Swatantryaveer Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांचे अर्थ समजण्यासाठी उत्कट भावना आणि अभ्यास असावा लागतो. त्यांच्या कविता घटनांवर भाष्य करतात. त्याक्षणी मनात उचंबळून आलेल्या भावनांची, विचारांची ती उत्कट अभिव्यक्ती असते. या काव्य प्रवाहाला वृत्त-छंदांचे बंधन नसते. ठरावीक लयीचे बंधन असते, पण यमक साधण्याचा अट्टहास नसतो. इंग्रजी साहित्यातील ब्लँक व्हर्सशी साधर्म्य सांगणाऱ्या काव्यरचनेची गरूडभरारी म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिभेतून साकारलेले वृत्त वैनायक!
 
Swatantryaveer Savarkar
मेवीरांनी वैनायक वृत्ताची रचना अंदमानच्या सेल्युलर जेलमधील तुरुंगवासादरम्यान केली. ‘मी स्वभावाने कवी पण परिस्थितीने क्रांतीकारक बनलो,’ असे ते स्वत:विषयी म्हणतात. Swatantryaveer Savarkar त्यांनी अनेक कविता विविध वृत्तात, छंदात बांधून लिहिल्या. विचारांच्या आवेगाला वृत्त-छंद किंवा यमकाचे बंधन न घालता, कागदावर उतरविणारे त्यांचे वैनायक वृत्त एका अर्थी निर्यमक धवलचंद्रिका वृत्त आहे, असा मतप्रवाह आहे. मात्र, हे मात्रवृत्त असून यात सहा मात्रंचे तीन गट आणि शेवटी एक गुरू अक्षर, अशी चरण योजना असते, अशीही एक मान्यता आहे.
 
 
दुसऱ्या मतप्रवाहानुसार य म त र असे चार गण आणि एक गुरू म्हणजे वैनायक वृत्त! स्वातंत्र्यवीरांनी यातील अंत्य यमक काढले आणि उपांत्य अक्षर लघू असावे, ही अटही काढली. परिणामी, यमक नसलेले आणि वाक्यार्थाचा संदर्भ तसाच पुढील ओळीत शिरणारे वैनायक वृत्त आकाराला आले. Swatantryaveer Savarkar अतिशय प्रभावी आणि भावनाप्रधान काव्य निर्यमक वैनायक वृत्तात रचण्याचा हा प्रयोग नंतर ‘पुस्तकबंद’ झाला.
 
 
सावरकरांच्या नावाशी साधर्म्य सांगणारे वैनायक हे नाव, त्याच्या गरूड या दुसऱ्या अर्थालाही साजेसे आहे. यमक, शब्दांची मर्यादा भेदत मुक्तछंदाच्या जवळ जाणाऱ्या या वृत्तात स्वातंत्र्यवीरांच्या ‘कमला’ व ‘गोमंतक’ या दीर्घकाव्याची मांडणी केली. वैनायक वृत्तात प्रयोगशील सावरकरांनी ‘मूर्ति दुजी ती’,‘मरणोन्मुख शय्येवर’, ‘महासागर’ या रचना अंदमानात लिहिल्या. Swatantryaveer Savarkar जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या या कवितांमध्ये वैनायकाचा जोरकसपणा लक्षात येतो.
 
 
वृत्ताच्या बंधनांमुळे पल्लेदार कल्पना खंडतात आणि वृत्तांच्या या हतबलतेची जाणीव सावरकरांना सगळ्यांच्या आधी झाली. वैनायक या मुक्तप्रवाही वृत्ताची खरी महत्ता सावरकरी पद्धतीने सावेश, साघात, वक्तृत्वपूर्ण शैलीने पठण केले असता आवर्जून लक्षात येते. या रचनांमध्ये ताल आहे, पण गेयता नाही. Swatantryaveer Savarkar या मौलिक काव्यरचनांद्वारे सावरकरांनी मराठी साहित्यात देशभक्ती, तत्त्वज्ञान आणि क्रांतिकारी विचारांना निर्विवादपणे नवी उंची दिली.
 
 
 
वैनायक वृत्ताचा आणि एकूणच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचा अभ्यास साहित्यिकांनी करायलाच हवा. त्यांची संस्कृतप्रचुर भाषा अभ्यासाशिवाय सर्वसामान्यांच्या आणि काव्यरसिकांच्याही आवाक्याबाहेर आहे. सावरकरांचा क्रांतीचा पैलू सर्वज्ञात आहे. पण, त्यांच्या काव्यरचनांचाही अभ्यास व्हायला हवा. Swatantryaveer Savarkar विद्यापीठांमध्ये स्वा. सावरकर साहित्य अध्यासन सुरू झाल्यास दर्जेदार चर्चा आणि संशोधन कार्यातून नवे अभ्यासक घडतील.