कोलकता,
dipankar bhattacharya पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बदुरिया नगरपालिकेचे अध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे नेते दिपांकर भट्टाचार्य यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले असून, त्यांच्या अटकेनंतर मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोन्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी पोलिसांनी दिपांकर भट्टाचार्य यांना एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या जवळून सुमारे ८० लाख रुपयांची रोकड आणि काही सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्यांनी घराशेजारील तागाच्या शेतात आणखी पैसे लपवून ठेवल्याची माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शेतात शोधमोहीम राबवली.
शेत परिसरात खोदकाम केल्यानंतर पाच पोत्यांमध्ये भरलेली मोठी रोकड आणि सोन्याचे दागिने पोलिसांच्या हाती लागले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण २.२४ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
दिपांकर भट्टाचार्य यांच्यावर नगरपालिका निधीतील अपहार, आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या पैशांचा संबंध कोणत्या सरकारी योजनांशी आहे का, नगरपालिका निधीचा गैरवापर झाला आहे का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलीस आणि तपास यंत्रणा करत आहेत.
या घटनेनंतर विरोधकांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगरपालिका स्तरावर भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप करत, राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.dipankar bhattacharya राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचे हे प्रकरण स्पष्ट करत असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसकडून या प्रकरणावर अद्याप सविस्तर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, पक्षातील सूत्रांनी तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे म्हटले आहे. सध्या तपास यंत्रणा जप्त केलेल्या रोकड आणि सोन्याच्या उगमाचा शोध घेत असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.