मुळावा परिसरातील 10 गावे क्षयरोग ‘हाय रिस्क’मध्ये

    दिनांक :28-May-2026
Total Views |
आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम तीव्र

उमरखेड, 
Tuberculosis: High Risk केंद्र सरकारच्या विशेष क्षयरोग (टीबी) शोध व प्रतिबंध मोहिमेअंतर्गत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाèया 10 गावांचा ‘हाय रिस्क’ (अतिधोकादायक) गावांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुळावा परिसरात खळबळबळ उडाली असून, आरोग्य विभागाकडून तातडीने तपासणी, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची गरज वाढली आहे.
 
 
tb
 
यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल असून तालुक्यात 54 गावे बाधित आहेत. केंद्र सरकारच्या 100 दिवसांच्या ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाच्या फेज 2 अंतर्गत महाराष्ट्रातील तब्बल 11 हजार 91 गावांची ‘हाय रिस्क’ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक 539 गावांचा समावेश असल्याने विदर्भातील स्थिती चिंताजनक बनली आहे. उमरखेड तालुक्यातील एकूण 54 गावांपैकी मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 10 गावे अतिधोक्याच्या छायेत आहेत. मुळावा आरोग्य केंद्रातील 10 हाय रिस्क म्हणून आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या गावांमध्ये वसंतनगर, अंबाळी, नागापूर, तरोडा, दिवटपिंपरी, कळमुला, बेलखेड, सुकळी (नवीन), धनज, पार्डी यांचा समावेश आहे.
 
 
 
Tuberculosis: High Risk  भौगोलिक आणि जीवनशैलीच्या निकषांवर गावे निश्चित करून गावांची भौगोलिक स्थिती, कुपोषण, लसीकरण, लोकांची जीवनशैली आणि आरोग्यविषयक परिस्थिती या निकषांच्या आधारे ही गावे निश्चित करण्यात आली आहेत. या मोहिमेअंतर्गत 14 वर्षांवरील सर्व वयोगटातील महिला व पुरुषांना टीबी आजाराबद्दल माहिती दिली जात आहे. तसेच संशयित रुग्णांची शोधमोहीम घेऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार केले जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अजय दुबे व कार्यालयाचे वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक विष्णू राठोड यांनी दिली आहे.
टीबी पूर्णपणे बरा होतो
क्षयरोग हा उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. नागरिकांनी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, सतत ताप येणे, वजन घटणे, अशक्तपणा किंवा रात्री घाम येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य तपासणी करून घ्यावी. खोकताना-शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा. मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध आहेत.
डॉ. विशाल दवणे
वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, मुळावा