भाच्याला वाचविण्याच्या नादात मामाला जलसमाधी

    दिनांक :28-May-2026
Total Views |
शेकापूर(बाई) येथील वणा नदीतील घटना
 
हिंगणघाट, 
Vana River Accident भाच्याला बुडताना पाहून मामाने नदीत उडी घेऊन वाचविले. मात्र, दुर्दैवाने नदीतील खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुयातील शेकापूर (बाई) येथील वणा नदीत घडली. राहुल कोळसे (३५) असे मृतकाचे नाव असून ही घटना बुधवार २७ रोजी सायंकाळी येळाकेळी घाटावर घडली.
 
 
Vana River
 
अधिक मास निमित्ताने वणा नदीच्या येळाकेळी घाटावर आंघोळ करण्यासाठी मामा राहुल कोळसे त्यांचा दहा वर्षीय भाचा भावेश डोमकावळे आणि निलेश कोळसे हे तिघे जण गेले होते. भाचा भावेश हा खोल खड्ड्यात बुडत असताना मामा राहुल कोळसे वाचवण्याकरिता नदीत उतरले. भाच्याला वाचविण्यात यश आले पण पाण्याचा अंदाज न आल्याने मामा राहुल कोळसे यांचा खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार घनश्याम पाटील चमूंसह येळाकेळी घाटावर पोहोचले. रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करूनही मृतदेह हाती न लागल्याने पोलिसांनी शोधकार्य स्थगित केले. दरम्यान, आज गुरुवार २८ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास राहुल कोळसे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना गावकर्‍यांना आढळला. राहुल कोळसे यांच्या मागे आई-वडील, पत्नी, ४ वर्षाचा मुलगा व ९ महिन्याची मुलगी आहे.
 
 
 
Vana River Accident  घटनेनंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. घरातील कर्त्या व्यतीचा मृत्यू झाल्यामुळे संकट कोसळले आहे. प्रशासनाने मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संतप्त गावकर्‍यांनी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस व प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. वरोरा तालुयातील येळाकेळी व हिंगणघाट तालुयातील शेकापूर बाई या दोन्ही घाटात मधोमध ५ फुटाचा रस्ता केल्यामुळे दोन्ही बाजूने वाळू घाटातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. अवैध वाळू उत्खननाचे मोजमाप करून चौकशी करण्यात यावी. दोषींवर कारवाई करण्यात यावी. दोन्ही वाळूघाट मालकांकडून योग्य ती रकम वसूल करण्यात यावी व हा घाट सील करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे, राकाँ शप गटाचे अतुल वांदिले, जिपचे माजी सदस्य मिलिंद कोपुलवार, पंसचे माजी सदस्य पुंडलिक तिजारे यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने वडनेरचे ठाणेदार घनश्याम पाटील, हिंगणघाटचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच वरोरा पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. तसेच घटनास्थळावर हिंगणघाटचे तहसीलदार, वरोर्‍याचे तहसीलदार, तलाठी, अधिकारी आणि गावकर्‍यांची उपस्थिती होती.
 
 
घाटात ४० फुट खोल खड्डे
अवैध वाळू उपस्यामुळे नदी घाटात ३० ते ४० फुट खोल खड्डे पडले आहे. त्यामुळेच राहुल कोळसे या इसमाचा बळी गेला. याला सर्वतोपरी प्रशासन जबाबदार असून प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली.