मंगरूळनाथ,
santosh walke बदलत्या हवामान परिस्थितीत शेती टिकवून ठेवण्यासाठी शून्य मशागत अथवा कमीत कमी मशागत शेती पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी केले. तालुक्यातील बोरव्हा येथील प्रगतिशील शेतकरी विनोद वाळके यांच्या शेतात २४ मे रोजी आयोजित शून्य मशागत शेती कशी करावी या विषयावरील चर्चा व मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी तालुका कृषी अधिकारी प्रल्हाद शेळके,पवन मिश्रा,सुरेश खांबलकर,नाजूक ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केशव भगत, गोपाल मिसाळ सरपंच प्रीतम भगत, रोकडे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
संतोष वाळके म्हणाले, विना नांगरणी शेती, शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागत ही शेती पद्धती जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतानाच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रभावी ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. तसेच पावसाचे पाणी अधिक प्रमाणात जमिनीत मुरते व बाष्पीभवन कमी होत असल्याने जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो. या पद्धतीमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची व निचरा करण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होऊन सुपीकता वाढण्यास मदत होते. मातीची रचना अधिक सक्षम बनते तसेच मशागतीवरील खर्चात बचत होते. भविष्यात रासायनिक खतांच्या वापरातही बचत होऊन शेतकर्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ होऊ शकते,असेही त्यांनी सांगितले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या पद्धतीत जमिनीची मशागत न करता पिकांचे व तणांचे अवशेष जमिनीतच राहू दिले जातात. हे अवशेष कालांतराने कुजून जमिनीतील जिवाणू, सूक्ष्मजीव व गांडुळांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात.santosh walke परिणामी पिकांना नैसर्गिकरीत्या आवश्यक अन्नद्रव्य मिळून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेला अकोला,वाशीम,यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या तंत्रज्ञानाबाबत शंका समाधान झाल्यामुळे तसेच प्रत्यक्ष शेत बघून यावर्षी या पद्धतीचा अवलंब करणार असल्याचे अनेक शेतकर्यांनी सांगितले.