हमीरपूरमध्ये वादळाने पूल कोसळून ५ मजुरांचा मृत्यू

    दिनांक :29-May-2026
Total Views |
हमीरपूर,
5 killed in bridge collapse in Hamirpur उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. बेटवा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान अचानक जोरदार वादळ आल्याने पुलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत काम करत असलेल्या पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही मजूर अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना कुरारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंदौर मोराकंदर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वादळामुळे पुलावरील स्लॅब, शटरिंग आणि गर्डर अचानक कोसळले. त्या वेळी अनेक मजूर खाली काम करत होते. काही क्षणातच संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिल्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले.
 
 
 
dt567
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. एसडीआरएफच्या पथकानेही बचाव मोहीम हाती घेतली असून, ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाकडून मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, असे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.